‘नयना’ क्षेत्रातील घरे महागणार
By admin | Published: November 18, 2014 01:53 AM2014-11-18T01:53:59+5:302014-11-18T01:53:59+5:30
नयना क्षेत्रात बांधकामांना परवानगी देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. मात्र ही परवानगी सध्याच्या प्रचलित धोरणानुसार देण्यात येणार आहे.
पनवेल : नयना क्षेत्रात बांधकामांना परवानगी देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. मात्र ही परवानगी सध्याच्या प्रचलित धोरणानुसार देण्यात येणार आहे. सुधारित धोरणानुसार विकासकांना वाढीव एफएसआय व इतर लाभ मिळणार नाही. तसेच परवानगी देताना नियमानुसार सिडकोने विकास शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने या परिसरातील घरांच्या किमती वाढण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.
नयना क्षेत्राच्या नियोजनाची जबाबदारी सिडकोवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे या क्षेत्रात बांधकाम परवानगी देण्याचे जिल्हाधिकारी आणि ग्रामपंचायतीचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. आता कोणतेही बांधकाम करण्यासाठी विकासक किंवा शेतकऱ्यांना आता सिडकोची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अशा परवानगीसाठी सिडकोकडे शेकडो अर्ज येवून पडले आहेत. मात्र सिडकोने तयार केलेल्या विकास आराखड्याला अद्यापी शासानाकडून मंजुरी न मिळाल्याने या परिसरातील विकासक हवालदील झाले आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे या परिसराच्या विकासाला खीळ बसली आहे. यापार्श्वभूमीवर सिडकोने सध्याच्या धोरणानुसारच बांधकामांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही परवानगी देत असताना संबधित बांधकामाला नयना क्षेत्रासाठी लागू असलेल्या वाढीव एफएसआयसह इतर सुविधांचा तुर्तास लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी ही परवानगी देताना नियमानुसार विकास शुल्क आकारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्याला विकासक आणि तेथील भूधारकांचा प्रखर विरोध आहे. अगोदर पायाभूत सुविधा द्या, मगच विकास शुल्काची आकारणी करा, असा पवित्रा या परिसरातील विकासक आणि भूधारकांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बांधकाम परवानगी देण्यासाठी सिडकोकडून आकारण्यात येणाऱ्या विकास शुल्कामुळे या परिसरातील घरांच्या किमती आवाच्या सव्वा वाढण्याची शक्यता असून याचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
पनवेल परिसरातील आदई, विचुंबे, उसर्ली, शिवकर, आकुर्ली, नेरे या गावात मोठ मोठया इमारती उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी अनेक स्थानिकांनीच बिनशेती त्याचबरोबर नगरचना विभागाची परवानगीकरीता अर्ज केला आहेत. या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवाना घेण्यात आला आहे.
अनेकांनी बांधकामाला सुरूवात केली व काही इमारती उभ्याही राहिल्यात. कित्येकांनी येथे घरे बुक केली आहेत. मात्र या बांधकामांना सिडकोची परवानगी नसल्याने त्यावर कारवाईचा बडगा उगाण्यात आला आहे.
विचुंबे, शिवकर, आदई, उसर्ली, देवद, आकुर्ली, नेरे, चिपळे, विहीघर, हरीग्राम या ठिकाणचे बांधकाम बंद पडले आहेत. इतकेच काय ज्या ज्या ठिकाणी बांधकाम सुरू होते त्या ठिकाणी सिडकोने कारवाईचा बडगा उगारला. विचुंबे आणि इतर ठिकाणी अशाप्रकारे बांधकामांवर हातोडा मारण्यात आल्याची उदाहरणे आहेत.(प्रतिनिधी)