‘नायर’मधील विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण : तिने मैत्रिणींकडेही वर्तविली होती भीती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 04:45 AM2017-09-14T04:45:27+5:302017-09-14T04:45:47+5:30
अभ्यास झेपत नसल्याने नायर हॉस्पिटलच्या वसतीगृहातील खोलीत भाग्यलक्ष्मी गौतमचंद मुठा हिने मित्राला व्हॉटसअपद्वारे कळवून आत्महत्या केली. तिने यापूर्वीही मैत्रिणींकडे अभ्यास जमत नसून जगणे अशक्य होत असल्याची भीती मैत्रिणींकडे व्यक्त केली होती. मात्र मैत्रिणींनी तिची समजूत काढून दुर्लक्ष केल्याचेही तपासात समोर आले आहे.
मुंबई : अभ्यास झेपत नसल्याने नायर हॉस्पिटलच्या वसतीगृहातील खोलीत भाग्यलक्ष्मी गौतमचंद मुठा हिने मित्राला व्हॉटसअपद्वारे कळवून आत्महत्या केली. तिने यापूर्वीही मैत्रिणींकडे अभ्यास जमत नसून जगणे अशक्य होत असल्याची भीती मैत्रिणींकडे व्यक्त केली होती. मात्र मैत्रिणींनी तिची समजूत काढून दुर्लक्ष केल्याचेही तपासात समोर आले आहे.
कोल्हापूरची रहिवासी असलेल्या भाग्यलक्ष्मी या नायर हॉस्पिटलच्या दंत महाविद्यालयात (बीडीएस) शिक्षण घेत होती. वडिलांच्या इच्छेमुळे तिने यात प्रवेश घेतला. मात्र भाग्यलक्ष्मीला सुरुवातीपासूनच अभ्यासक्रम जमत नसल्याने ती तणावात होती. ‘मला अभ्यास जमत नाही. मात्र वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी खूप पैसा खर्च केला आहे. त्यामुळे मागे फिरणेही शक्य नाही. अशात जगणे अशक्य होत चालले आहे,’ असे तिने मैत्रिणींना सांगितले होते. वेळोवेळी त्यांनी तिची समजूत काढली होती.
दरम्यान, बुधवारी भाग्यलक्ष्मीचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.