भव्य सोहळ्यात नयपद्मसागर महाराजांना ‘आचार्य’ पदवी प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 05:49 AM2023-03-12T05:49:46+5:302023-03-12T05:51:19+5:30
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा, देशभरातील साधू, साध्वींसह अनुयायांनी लावली हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जैन धर्मगुरू नयपद्मसागर महाराज यांना मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्स येथील भव्य अन् दिमाखदार सोहळ्यात शनिवारी राष्ट्रसंत पद्मसागर सुरिश्वरजी महाराज यांनी सुरी मंत्र देत ‘आचार्य’ ही पदवी प्रदान केली. नयपद्मसागर महाराज यांच्यासोबत प्रशांत सागर महाराज यांनादेखील या शानदार कार्यक्रमात ‘आचार्य’ ही पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला जैन संप्रदायातील अनेक साधू, साध्वी, अनेक देशांतून आलेले अनुयायी तसेच राजकीय व प्रशासकीय सेवेतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
अनुयायांना संबोधताना आचार्य नयपद्मसागर महाराज म्हणाले की, आजचा दिवस हा अत्यंत मंगल दिवस आहे. आमच्यावर आता विश्वकल्याणाची जबाबदारी आली आहे. देवाच्या नजरेत पुढे जाण्याचा आम्ही आमच्या कार्याच्या माध्यमातून प्रयत्न करू. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी जैन संप्रदायातील सर्व पंथातील साधू, संत, साध्वी आले, याचा मला विशेष आनंद आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, हा ऐतिहासिक सोहळा आहे. आचार्य नयपद्मसागर महाराजांनी समाजाला एकत्र आणत त्यांच्यामध्ये संघटनेची भावना निर्माण केली. समाजाला पुढे नेणाऱ्या एका मुनीचा गौरव झाला, ही अतीव आनंदाची गोष्ट आहे.
यावेळी सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा म्हणाले की, नयपद्मसागर महाराज यांना आचार्य ही पदवी प्रदान करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले, याचा मला विशेष आनंद आहे. हे असे आचार्य आहेत की, ज्यांनी नित्याच्या परंपरेच्या बाहेर जात जैन समाजाच्या शक्तीला जागृत केले.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) आणि जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन (जिओ) या संस्थांची उभारणी केली. जितोच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न केले. आयएएस, आयपीएस, आयआरएस अधिकारी, न्यायाधीश जैन समाजातून निर्माण केले पाहिजेत. त्यासाठी आपण विशेष शाळा निर्माण केल्या पाहिजेत. जेणेकरून या देशाच्या व्यवस्थेत जैन तत्त्वावर, शिकवणीवर आधारित ते काम करू शकतील. त्याचप्रमाणे धर्मातील जी तत्त्वे आहेत, त्या आधारे व्यवसाय सुरू करत लाखो लोकांच्या हाताला काम मिळू शकेल, अशी शिकवण त्यांनी दिली आहे.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महिला व बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, मनसे नेते बाळा नांदगावकर, माजी न्यायमूर्ती किशोर तातेड, निवृत्त आयपीएस अधिकारी पी. के. जैन, सिलो समूहाचे अध्यक्ष व जितोचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठोड, भाजपचे कोषाध्यक्ष किरीट भन्साळी, भाजप नेते राज पुरोहित, पृथ्वीराज कोठारी, चंपालाल वर्धन, सौरभ बोरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
क्षणचित्रे...
- सकाळी ९ वाजेपासून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईच्या विविध भागांतून महालक्ष्मी रेस कोर्सच्या दिशेने लोकांचे जथ्ये येताना दिसत होते. अत्यंत आकर्षक रंगातील पारंपरिक वस्त्र परिधान केलेल्या लोकांमुळे व भक्ती संगीतामुळे वातावरणात प्रसन्नता होती.
- रेस कोर्समध्ये शिरताना अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रांगेने चालत लोक कार्यक्रमस्थळी पोहोचले. कार्यक्रमस्थळी रेड कार्पेट अंथरले असल्याने आत शिरणाऱ्या प्रत्येकाला आपण एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला आल्याची जाणीव होत होती. पाण्याची तसेच स्वच्छतागृहांची व्यवस्थादेखील अत्यंत चोख ठेवण्यात आली होती.
- केवळ मुंबई, महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश येथूनदेखील अनेक अनुयायी आले होते. लंडन, न्यूयॉर्क, नायजेरिया येथूनदेखील लोकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती लावली होती.
स्वागत् अन् जल्लोष...
आचार्य पदग्रहण सोहळ्यासाठी भव्य मंच उभारण्यात आला होता. त्याच्यासमोर रॅम्प तयार करण्यात आला होता. आचार्य पदग्रहण सोहळ्यासाठी नयपद्मसागर महाराज आणि प्रशांतसागर महाराज जेव्हा व्यासपीठावर आले, तेव्हा वाजत गाजत त्यांचे स्वागत करण्यात आले. एका विशेष गानवृंदाने त्यांचे विविध संगीत आराधनेच्या माध्यमातून स्वागत केले. तर उपस्थित हजारो लोकांनी पताका फडकवत दोघांचे स्वागत केले.
केरळमध्ये पूर आला होता, तेव्हा आचार्य नयपद्मसागर महाराजांनी तेथील मदतकार्यात जातीने लक्ष घातले होते. तसेच तेथील मदतकार्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा करत मदत केली होती. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
आचार्य ही केवळ पदवी नसून ती एक मोठी तपश्चर्या आहे. ही तपश्चर्या करतानाच आचार्य नयपद्मसागर महाराजांनी लोककल्याणाचे मोठे काम केले आहे. ते केवळ संत नाहीत तर ते द्रष्टे आहेत. धर्मासोबत ते राष्ट्रभक्तीही शिकवतात. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"