आर्यन खानसह ८ जणांची नावं NCBने केले जाहीर; गुन्हे दाखल करुन अटक करण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 11:48 AM2021-10-03T11:48:28+5:302021-10-03T11:49:52+5:30
आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई: मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये सुरुवातील एका बड्या अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत होते. याचदरम्यान आता या प्रकरणी बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानची एनसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे.
सरद प्रकरणात आर्यन खान याचीही चौकशी केली जात आहे. ड्रग्ज पार्टीशी आर्यन खान याचा काय संबंध होता याबाबत त्याची चौकशी करण्यात आली आहे. पण अद्याप त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही व अटक केलेली नाही. प्रकरणाची चौकशी सुरू आहे, अशी माहिती एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं. याशिवाय ड्रग्ज पार्टीच्या ६ आयोजकांना समन्स धाडण्यात आले आहेत.
शनिवारी रात्री झालेल्या कारवाईनंतर एनसीबीने आर्यन खानचे नाव गुप्त ठेवले होते. मात्र, आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. या सगळ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली जाईल. त्यानंतर आर्यन खानसह आठ जणांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना किला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
Eight persons -- Aryaan Khan, Arbaaz Merchant, Munmun Dhamecha, Nupur Sarika, Ismeet Singh, Mohak Jaswal, Vikrant Chhoker, Gomit Chopra -- are being questioned in connection with the raid at an alleged rave party at a cruise off Mumbai coast: NCB Mumbai Director Sameer Wankhede pic.twitter.com/KauOH2ULts
— ANI (@ANI) October 3, 2021
दरम्यान, एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान याचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला असून त्यातून माहिती गोळा केली जात आहे. आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटची आणि मेसेजेसची चौकशी केली जात आहे. या क्रूझ पार्टीसाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या तीन तरुणींनाही एनसीबीनं ताब्यात घेतलं असून त्यांचीही चौकशी केली जात आहे. या तीनही बड्या उद्योजकांच्या मुली असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई-गोवा-मुंबई ट्रिपचे आयोजन-
क्रूझवर कोकेन, चरस, एमडी, गांजा आदी मादक पदार्थ अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. एनसीबीची रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्डेलिया या २००० प्रवासी क्षमतेच्या जहाजावर मुंबई-गोवा-मुंबई ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. क्रूझवर उच्चभ्रू वर्गीयांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्यात ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळाली. शनिवारी रात्री गोव्याला जाऊन ते सोमवारी सकाळी परत मुंबईला येणार होते. त्यासाठी आयोजकांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागविले होते. एनसीबीच्या पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून क्रूझ ग्रीन गेटजवळ थांबले असताना छापा मारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
क्रुझवर कसं पोहोचलं ड्रग्ज?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी आपल्या पॅंट, अंडरवेअर, कॉलरच्या सिलाईमध्ये तसेच महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये ड्रग्ज लपवून आणलं होतं.