Join us

एनसीबीकडून दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:06 AM

*ड्रग्ज तस्करीत सहभाग : ठाणे जेलमधून घेतला ताबालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महानगरातील अमली पदार्थ ...

*ड्रग्ज तस्करीत सहभाग : ठाणे जेलमधून घेतला ताबा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महानगरातील अमली पदार्थ विरोधात मोहीम राबिणाऱ्या अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) बुधवारी मोठी कारवाई करताना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक केली. मुंबईतील ड्रग्ज तस्करी आणि माफियांचे धागेदोरे त्याच्यापर्यंत पोहचल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली असून ठाणे कारागृहातून त्याचा ताबा घेण्यात आला आहे. न्यायालयात हजर करून कोठडी घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

इकबाल कासकर हा गेल्या तीन वर्षांपासून विविध गुन्ह्यात विविध तपास यंत्रणेच्या ताब्यात आहे. गेल्या काही महिन्यांपासून पासून तो मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) न्यायालयीन कोठडीत आहे. ठाण्यातील कारागृहात त्याला ठेवण्यात आले होते. दरम्यान, काश्मीर येथून मोठ्या प्रमाणात हशीश मुंबई आणून विक्री करणाऱ्या ड्रग्ज रॅकेटवर एनसीबीने कारवाई केली होती. त्यातील तस्कर हे इकबालशी संबधित निघाल्याने विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने त्याच्यावरही गुन्हा दाखल करीत ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर अडीच महिन्यापूर्वी दक्षिण मुंबईत डोंगरी येथील ड्रग्जचे रॅकेट उघडकीस आणले होते. त्यातील आरोपीही इकबाल व डी गॅंगच्या संपर्कात असल्याची एनसीबीची माहिती आहे, त्यामुळे त्या गुन्ह्यातही त्याच्याकडे कसून चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इक्बाल कासकरवरील आरोप

एनसीबीने इक्बाल कासकरवर प्रामुख्याने जम्मू काश्मीरमधून पंजाबमध्ये २५ किलो ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. हे ड्रग्ज मुंबईतदेखील विकण्यात आले होते. काश्मीरमधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करीच्या तपासात कासकर याचा संबंध असल्याचे उघड झाले. आता इकबाल कासकर याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. इकबाल कासकर याचे अटक वॉरंट कोर्टाकडून मिळवल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल.

इकबाल कासकर २०१८ पासून तपास यंत्रणाच्या ताब्यात आहे. त्याला पहिल्यांदा ठाणे पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर सीबीआय, ईडी व आता, त्याचा एनसीबीच्या गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाला आहे. तर मनी लाँड्रिंग प्रकरणी महाराष्ट्रातील एका अग्रणी बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इकबाल कासकरने उत्तर मुंबईतील एका बिल्डरकडे तीन कोटी रुपये मागितल्याचे प्रकरणदेखील समोर आले होते.

--------------

इकबाल दाऊदच्या सूचनेनुसार मुंबईतील गुन्हेगारी नेटवर्कवर सांभाळत होता. अनेक वर्षे दुबईत राहून त्याने हे काम केले होते. तो २००३ ला भारतात परतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर २००७ मध्ये तो जेलमधून बाहेर आला. पायधूनी येथे राहून तो गुन्हेगारी कारवायात सहभागी होता. क्रॉफड मार्केट येथील सारा-सहारा भूखंड गैरव्यवहार प्रकारणात त्याच्यावर आरोप आहेत. २०१८ मध्ये ठाणे पोलिसांनी त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली. त्यानंतर त्याच्यावर मोक्का अनव्ये कारवाई करण्यात आली होती.