एनसीबी पुन्हा ॲक्शनमध्ये! ‘मन्नत’वर जाऊन नोटीस, तर अन्यन्याचा मोबाइल, लॅपटॉप जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 10:02 AM2021-10-22T10:02:31+5:302021-10-22T10:03:03+5:30

कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू असताना एनसीबी पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आली आहे.

NCB conducts search at SRK's Bandra home 'Mannat' to pick up a few documents Ananya Pandeys house raided | एनसीबी पुन्हा ॲक्शनमध्ये! ‘मन्नत’वर जाऊन नोटीस, तर अन्यन्याचा मोबाइल, लॅपटॉप जप्त

एनसीबी पुन्हा ॲक्शनमध्ये! ‘मन्नत’वर जाऊन नोटीस, तर अन्यन्याचा मोबाइल, लॅपटॉप जप्त

Next

मुंबई : कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू असताना एनसीबी पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. आर्यन खानचे ड्रग्ज कनेक्शन तपासण्यासाठी एनसीबीच्या एका पथकाने ‘किंग’ खान शाहरुख याच्या ‘मन्नत’ या निवासस्थानी पोहोचून नोटीस बजावली, तर 
अभिनेता चंकी पांडे हिची कन्या अभिनेत्री अन्यन्या हिच्याकडे चौकशी सुरू केली आहे. सायंकाळी  सव्वासहा वाजेपर्यंत तिच्याकडे विचारणा करण्यात येत होती. त्यापूर्वी सकाळी अधिकाऱ्यांनी तिच्या वांद्रे येथील घरी जाऊन तिचा मोबाइल, लॅपटॉप व अन्य इलेक्ट्रिक डिव्हाइस जप्त केला आहे.

एनसीबीकडून येत्या काही दिवसांत अन्य काही ‘सेलिब्रेटी’कडे चौकशी केली जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली. एनसीबीने दोन ऑक्टोबरला टाकलेला छापा आणि आर्यन खानला केलेली अटक देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. बुधवारी न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर एनसीबीने या प्रकरणाच्या तपास कामात पुन्हा वेग घेतला आहे. गुरुवारी दोन स्वतंत्र पथके  वांद्रे व अंधेरीत अनुक्रमे अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री अन्यन्या पांडे हिच्या घरी पोहोचले. मन्नत येथे गेलेल्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खानची मॅनेजर पूजा हिच्याकडे  आर्यनशी संबंधित कागदपत्राची मागणी करणारी नोटीस बजाविली. ड्रग्ज पार्टीशी संबंधित आणखी तपास करण्यासाठी त्याची वैद्यकीय, शैक्षणिक कागदपत्रे तसेच परदेशातील वास्तव्याबद्दल माहिती देण्याची मागणी त्यामध्ये करण्यात आली असल्याचे समजते. सुमारे अर्धातास पथक त्याठिकाणी होते. दुपारी एकच्या सुमारास ते मन्नतवरून बाहेर पडले. यावेळी अधिकाऱ्यांनी काहीही भाष्य करण्यास नकार दिला.

दरम्यान, अन्य पथकाने  अधिकारी अनन्या पांडे यांच्या घरी पोहोचून तिला चौकशीसाठी दुपारी दोन वाजता एनसीबीच्या बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजाविले. यावेळी अधिकाऱ्यांनी तिचा मोबाईल फोन, लॅपटॉप व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात घेतल्या असल्याचे सांगण्यात आले.  आर्यन खानच्या ड्रग्ज चॅटमध्ये अनन्या पांडे हिचे नाव असल्याने तिच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. त्यातून तिच्या सहभाग होता का, ती ड्रग्ज घेत होती काही बाब स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले. 

मुलाच्या भेटीसाठी शाहरुख आर्थर रोड कारागृहात
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्थर रोड कारागृहात असलेल्या मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी बॉलीवूड किंग शाहरुख खान गुरुवारी कारागृहात पोहोचला. सर्वसामान्यांंप्रमाणे त्यालाही आर्यनसोबत भेटण्यास देण्यात आले. यावेळी १० मिनिटांच्या भेटीनंतर शाहरुख कारागृहाबाहेर पडला.

एनसीबीच्या पथकाने २ ऑक्टोबरच्या रात्री कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी करून आर्यन खानसह आठ जणांना ड्रग्ज आणि रोख रकमेसह अटक केली होती. त्यानंतर एनसीबीचे अटकसत्र सुरू आहे. आर्यन खानच्या जामिनावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे कारागृहात आर्यनचा मुक्काम वाढला आहे. त्यामुळे गुरुवारी शाहरुखने आर्थर रोड कारागृहात भेट घेतली. 

कारागृह अधीक्षकाकड़ून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख सकाळी ९ च्या सुमारास कारागृहाच्या आत आला तेव्हा त्याची कारागृह नोंदवहीत त्याची नोंदणी करण्यात आली. आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे तपासून त्याला टोकनसह आत पाठवले. यावेळी चार सुरक्षा रक्षकही त्याच्यासोबत होते. आर्यन आणि शाहरुख यांच्यात १० मिनिटे बोलणे झाले. यावेळी आर्यनला अश्रू अनावर झाल्याचेही समजते. त्यांच्यात संभाषणादरम्यान दोघांमध्ये काच होती. दोन्ही बाजूंनी इंटरकॉमवरून संवाद केला. बैठकीची वेळ संपल्यानंतर स्वतः शाहरुख ९.३५ च्या सुमारास बाहेर आला. यावेळी कारागृहातील अन्य आरोपींना भेटण्यासाठी बाहेर बसलेल्या कुटुंबीयांनाही नमस्कार करत तो बाहेर पडला. यादरम्यान त्याने कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळले.

 

Web Title: NCB conducts search at SRK's Bandra home 'Mannat' to pick up a few documents Ananya Pandeys house raided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.