मुंबई: मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर धाड टाकत ८ जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्यानं बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. एनसीबीच्या कारवाईनं अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सर्व आरोपींना एनसीबीनं किल्ला कोर्टात हजर केलं असून या प्रकरणी थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे.
एनसीबीचे अधिकारी शाहरुख खानचा बंगाल मन्नतची झडती घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र एनसीबीनं अशी कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आर्यन खान प्रकरणात मन्नतची झडती घेतली जाणार नसल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ईटाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. सध्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. प्रख्यात वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात आर्यनची बाजू मांडणार आहेत. सतीश यांनी याआधी अभिनेता सलमान खान, संजय दत्त यांच्या वतीनंही युक्तिवाद केला आहे.
आर्यनला क्रूझवर आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्याच्याकडे एनसीबीच्या अधिकाऱ्यांना कोणतेही अंमली पदार्थ सापडलेले नाहीत, असा मानेशिंदेंचा युक्तिवाद आहे. आर्यन अंमली पदार्थ घेत असल्याचे कोणतेही पुरावे आढळून आलेले नाहीत. मात्र तरीही एनसीबीनं त्याच्याविरोधात अंमली पदार्थांचं सेवन घेतल्याचा गुन्हा दाखल केला आहे, असं मानेशिंदे म्हणाले.
आर्यन खानला कशी झाली अटक?क्रूझवर ड्रग पार्टी होणार असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी क्रूझची तिकिटं काढली. क्रूझवरील रेव्ह पार्टी दरम्यान तिथे १३०० ते १४०० जण उपस्थित होते. मात्र एनसीबीकडून ८ ते १० जणांचा शोध सुरू होता. तशी टीप त्यांना मिळाली होती. यामध्ये आयर्न खानच्या नावाचा समावेश होता. आर्यन खान आणि अरबाज मर्चंटवर नजर ठेवण्याची जबाबदारी एका विशेष अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली होती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानच्या नावानं क्रूजवर कोणत्याही खोलीचं बुकिंग नव्हतं. मात्र आयोजकांनी आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसाठी खास खोली ठेवली होती. ही सोय क्रूजवर आयोजकांनी स्वत: केली होती. आर्यन आणि अरबाज त्या खोलीत जात असताना अचानक एनसीबीचे अधिकारी दोघांच्या समोर आले. त्यांनी दोघांना खोलीत प्रवेश करण्यापासून रोखलं. दोघांची झडती घेण्यात आली. त्यात आर्यन खानकडे काहीही सापडलं नाही. पण अरबाजच्या बूटांमध्ये चरस आढळून आलं.