Join us

शोविक चक्रवर्तीचा जामीन रद्द करण्यासाठी एनसीबी उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:07 AM

ड्रग्स प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत ड्रग्सप्रकरणी ‘एनसीबी’ने सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिचा ...

ड्रग्स प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत ड्रग्सप्रकरणी ‘एनसीबी’ने सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक चक्रवर्तीचा जामीन रद्द करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

विशेष एनसीबी न्यायालयाने शोविकचा जामीन मंजूर करताना यापूर्वी उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणांकडे दुर्लक्ष केले, असे ‘एनसीबी’ने याचिकेत म्हटले आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्ती हिचा जामीन मंजूर केला. मात्र, शोविकची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी विशेष न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला.

उच्च न्यायालयाने शोविकची जामिनावर सुटका करण्यास नकार देताना काही निरीक्षणे नोंदवली. ड्रग्सची विक्री करणाऱ्यांशी संबंध आहेत, असे दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. शोविक जामिनावर सुटल्याने तो पुन्हा त्याच व्यवसायात गुंतेल, अशी भीती ‘एनसीबी’ने व्यक्त केली. न्यायालय एनसीबीच्या याचिकेवर ३० मार्च रोजी सुनावणी घेण्याची शक्यता आहे.