ड्रग्ज तस्कर सजनानीशी कनेक्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) बुधवारी राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची बुधवारी कसून चाैकशी केली. बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात सुमारे आठ तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी करण्यात आली. सकाळी साडेदहा वाजता त्यांना बोलावण्यात आले हाेते.
ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक केलेल्या ब्रिटिश नागरिक करण सजनानी यांच्याशी त्यांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ड्रग्ज तस्करीतून हा व्यवहार झाला आहे का, याची माहिती घेण्यात येत आहे. त्याबाबत खात्री पटल्यास खान यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
शनिवारी अटक केलेल्या सजनानी व अन्य दोन तरुणींकडून एनसीबीने सुमारे २०० किलो परदेशी गांजा जप्त केला. करणच्या मोबाइलची तपासणी सुरू आहे. त्यामध्ये त्याने गुगल पे ॲपवरून समीर खान यांच्या खात्यावर काही रक्कम पाठविल्याचे समाेर आले. त्याअनुषंगाने त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्याने ही रक्कम कशासाठी घेतली, याची माहिती घेतली जात आहे. कोविड-१९ च्या काळात करणला आर्थिक चणचण भासू लागल्याने त्याला आपण मदत म्हणून हे पैसे दिले होते, ते त्याने परत केले आहेत, असे त्यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, या उत्तरावर समाधान न झाल्याने अन्य बाजू व शक्यता तपासल्या जात आहेत.
शनिवारी एनसीबीने २०० किलो परदेशी गांजा जप्त करून राहिला फर्निचरवाला, तिची बहीण शहिस्ता फर्निचरवाला आणि
करण सजनानीला अटक केली. त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
.....................