'त्या' दोघांच्या मदतीनं वानखेडेंकडून बड्या लोकांचे फोन टॅप; मलिकांचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 11:09 AM2021-10-26T11:09:04+5:302021-10-26T11:10:59+5:30
मंत्री नवाब मलिक यांचे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप
मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. वानखेडेंच्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. मात्र समीर वानखेडेंनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली. ही फसवणूक आहे. समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांवर मी ठाम आहे. त्यांनी माझ्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी कोर्टाच्या कार्यवाहीला सामोरं जाण्यास तयार आहे, असं नवाब मलिक आज पत्रकार परिषदेत म्हणाले. वानखेडेंनी अनेक बड्या लोकांचे फोन टॅप केल्याचा आरोपही त्यांनी केला.
मागच्या दोन दिवसांपासून एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्या बाबत अनेक बाबी समोर आल्या आहेत. 6 तारखेपासून आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामध्ये आता अधिक स्पष्टता आली आहे. आमची लढाई एनसीबीसोबत नाही. एनसीबीनं अनेकदा चांगलं काम केलं आहे. परंतु एक व्यक्ती बोगसगिरी करून नोकरी घेतो आणि ज्यावेळी या बाबी समोर आणल्या, त्यावेळी मात्र वानखेडे म्हणतात माझ्या कुटुंबावर नवाब मलिक आरोप करत आहेत. मी हिंदू मुस्लिम असा मुद्दा समोर आणत नव्हतो. भाजपने अनेकवेळा म्हटलं, नवाब मलिक मुस्लिम असल्यामुळे अशाप्रकारे आरोप करत आहेत. मात्र मी कधीही असं केलं नाही. समीर वानखेडेंनी खोटा जन्म दाखला सादर करून नोकरी घेतली. ही गोष्ट चुकीची आहे, असं मलिक म्हणाले.
वानखेडे यांच्याविरुद्ध सुरू केलेली लढाई आम्ही अशीच पुढे घेऊन जाणार आहोत, असं मलिक यांनी सांगितला. मी जो दाखला ट्विट केला आहे तो खरा आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक दाखला पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की त्यावर नाव वेगळं एका बाजूला लिहिण्यात आलं आहे. समीर वानखेडे जन्मापासून दलित आहेत असं सर्टिफिकेट दिलं. त्याआधारे आत्तापर्यंत नोकरी केली. समीर यांच्या वडिलांनी एका मुस्लिम महिलेसोबत लग्न केलं आणि त्यानंतर ते मुस्लिम म्ह्णून राहत होते. परंतु नोकरीच्या वेळी त्यांनी आपला दाखला बदलला. त्यांनी वडिलांच्या जातीचा वापर केला. जर मी सादर केलेलं सर्टिफिकेट खोटं आहे तर मग त्यांच्या वडिलांनी किंवा स्वतः वानखेडे यांनी आपलं जन्म प्रमाणपत्र समोर आणावं, असं आव्हान मलिक यांनी दिलं.
मला वैयक्तिक बदनामी करायची नाही. परंतु समीर वानखेडेंच्या वडिलांनी धर्मातर करून विवाह केला होता. समीर यांनी बनावट जात प्रमाणपत्र बनवून 'आयआरएस' नोकरी घेतली. याबाबत आपण ठाम आहोत. त्यांनी आपल्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा, न्यायालयात सर्व सत्य बाहेर येईल, असं मलिक म्हणाले.
अनेक बड्या लोकांचे फोन टॅप
वानखेडेंकडून अनेक राजकारणी, बॉलिवूड कलाकार, बिल्डरांचे फोन टॅप केले जातात. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे दोन खासगी व्यक्तींद्वारे काही व्यक्तींचे फोन टॅपिंग करत आहेत. यातील एक व्यक्ती मुंबईतील आणि दुसरी व्यक्ती ठाण्यातील आहे, असा दावादेखील मलिक यांनी केला.