एनसीबीचे मुंबई, गोव्यात छापे; कोट्यवधीचे ड्रग्ज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 07:31 AM2021-09-08T07:31:44+5:302021-09-08T07:32:36+5:30
पहिल्या कारवाईत भायखळा येथील मोहम्मद नासीर सैफूर रेहमान खान याच्या घरी एनसीबीने छापा टाकत २७ किलो कोडियन सीरम जप्त केले. यावेळी खानसह मोहम्मद सलमान शेखलाही ताब्यात घेतले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि गोवा येथे चार ठिकाणी छापेमारी करून एका नायजेरियन ड्रग्ज तस्करासह चौघांना अटक केली आहे. या वेगवेगळ्या कारवाईत कोट्यवधीचे ड्रग्ज जप्त केले आहे.
एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी आणि मंगळवारी केलेल्या या कारवाईमध्ये एनसीबीने ३४.५ किलो ग्रॅम कोडीन सिरप, व्यावसायिक प्रमाणातील एलएसडी, १०५ ग्रॅम हेरॉईन, ४०० ग्रॅम वजनाच्या नायट्राझेपमच्या ७०० गोळ्या, कोकेन आणि हायड्रोपोनिक मल्टी स्ट्रेन व्हीड असे ड्रग्ज जप्त केले.
पहिल्या कारवाईत भायखळा येथील मोहम्मद नासीर सैफूर रेहमान खान याच्या घरी एनसीबीने छापा टाकत २७ किलो कोडियन सीरम जप्त केले. यावेळी खानसह मोहम्मद सलमान शेखलाही ताब्यात घेतले. त्यापाठोपाठ माझगावच्या अजय नागराज याच्याकडून साडेसात किलो कोडियन सीरम जप्त केले आहे. तसेच हेरोईन, गांजा आणि काही ड्रग्जच्या गोळ्या जप्त करत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत गोवामध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्या नायजेरियन तस्कराला कलंगुट येथील एका हॉटेल परिसरातून अटक केली. डेविड चिब्यूक चिसॉम असे या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे. त्यांच्याकडून एलएसडीच्या ११ ब्लॉट्स मिळून जप्त केल्या आहेत. त्यापाठोपाठ बेलार्ड पियर भागातील फॉरेन पोस्ट ऑफिसमध्ये एनसीबीच्या पथकाने धाव घेतली. तेथे कॅनडामधून आलेल्या पार्सलमध्ये कॅनबीस सापडले आहेत.
मुंबईतून १० लाख ९० हजारांचे एमडी जप्त
nएएनसीने दोन वेगवेगळ्या कारवाईत १० लाख ९० हजार रुपये किमतीचा १०९ ग्रॅम एमडी मिळून आला.
nयाप्रकरणी पालघर आणि मुंबई सेंट्रल येथील दोघांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी विभागाच्या कांदिवली कक्षाने ही कारवाई केली आहे.