लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कुख्यात माफिया दाऊद इब्राहिम याचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात अमली पदार्थ नियंत्रण कक्षाची (एनसीबी) छापेमारी सुरूच आहे. शनिवारी दाऊदचा हस्तक व ड्रग्ज तस्कर चिकू पठाणच्या सहकाऱ्याच्या पुण्यातील खडकवासला परिसरात एका घरी छापा टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
डोंगरीतून जप्त केलेल्या ड्रग्जची तपासणी करण्याचे काम शनिवारीही सुरू होते. येथील नूर मंझील या इमारतीतून ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करत ‘एम.डी.’ व ते बनवण्यासाठी आवश्यक रसायनांचा साठा जप्त केला. कारवाईदरम्यान दोन कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि अद्ययावत शस्त्रसाठाही पथकाने हस्तगत केला आहे.
या कारखान्यात अमली पदार्थ तयार करून विकणारे दोन आरोपी, त्यांचे साथीदार दाऊद इब्राहिम व कुख्यात तस्कर करीम लाला यांच्याशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमली पदार्थ उत्पादन, विक्रीत गुंतलेल्या या संपूर्ण टोळीस जेरबंद करण्यासाठी दक्षिण मुंबईवर लक्ष केंद्रित केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार (कोलंबियातील ड्रगमाफिया) या नावाने ओळख असलेल्या परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाण याला अटक केल्यानंतर त्याचा साथीदार आरिफ भुजवाला ताब्यात घेतले. त्याच्या नूर मंझील इमारतीतील घरातून ड्रग्जचा मोठा साठा, दोन कोटी १८ हजारांची रोकड जप्त केली. गेल्या ५ वर्षांत या गोरखधंद्यातून १५०० कोटींवर रक्कम डी गँगने मिळविली असल्याचे सांगितले जाते. शनिवारी एनसीबीच्या एका पथकाने चिकू पठाणच्या पुण्यातील हस्तकाच्या घरी छापा टाकला. त्याठिकाणाहून महत्त्वपूर्ण ऐवज जप्त केल्याचे सांगण्यात आले.
....................................