समीर वानखेडे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर; नवाब मलिकांबाबत प्रश्न विचारताच...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 04:07 PM2022-04-14T16:07:04+5:302022-04-14T16:07:49+5:30
सर्व तरुणांनी बाबासाहेब आंबेडकरांना आपले आदर्श मानावे आणि त्यांच्या सिद्धांतांचे पालन करावे, असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.
मुंबई: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. कोरोना संकटकाळामुळे अनुयायांना बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मर्यादा येत होत्या. यंदा दादर येथील चैत्यभूमीवर अनुयायांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले. यामध्ये चर्चेचा विषय ठरले ते एसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे.समीर वानखेडे यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.
नवाब मलिकांचे जावई आणि ज्येष्ठ अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवरील कारवाईमुळे समीर वानखेडे चर्चेत आले होते. यानंतर समीर वानखेडे यांनी बदली करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर आलेल्या समीर वानखेडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आमचे परमपूज्य, आदरणीय बाबासाहेबांची १३१ वी जयंती असून त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो. सर्व तरुणांना आवाहन करतो की, बाबासाहेब आंबेडकरांना आपले आदर्श मानावे आणि त्यांनी केलेला संघर्ष, सिद्धांत यांचे पालन करावे, असे वानखेडे यांनी सांगितले.
नवाब मलिकांबाबत प्रश्न विचारताच...
आंबेडकर किंवा सिद्धार्थ कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, सिद्धांत यासंबंधी एक लेक्चर ठेवावे आणि त्यातून तरुणांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन वानखेडे यांनी केले. यावेळी त्यांना नवाब मलिकांची संपत्ती जप्त झाल्याबद्दल विचारताच त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. पत्रकारांसमोर हात जोडले आणि तेथून निघून गेले, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांच्याशी संबंधित आठ मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली आहे. त्यात कुर्ला, वांद्रे व उस्मानाबाद येथील मालमत्तांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात ‘ईडी’ने मुंबई उपनगर जिल्हा निबंधक कार्यालयात पत्र पाठवून, मलिक यांच्या मुंबईतील मालमत्तांची कागदपत्रे मागवली होती. कुर्ला पश्चिम येथील गोवावाला कंपाऊंड, कुर्ला पश्चिम येथील व्यावसायिक मालमत्ता, तीन सदनिका, उस्मानाबाद येथील १४७ एकर जमीन, वांद्रे पश्चिम येथील दोन सदनिका या मालमत्तांवर ‘ईडी’ने कारवाई केली आहे. या मालमत्ता नवाब मलिक, त्यांचे कुटुंबिय, मे. सॉलिड्स इन्वेस्टमेंट प्रा. लि. व मे. मलिक इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या नावावर आहेत. याशिवाय मे. सॉलिड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. व मे. मलिक इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यामार्फत या मालमत्तांवर गोळा करण्यात आलेले ११ कोटी ७० लाख रुपयांचे भाडेही गुन्ह्यांतील उत्पन्न असल्याचे ‘ईडी’कडून सांगण्यात आले.