Sameer Wankhede vs Nawab Malik: क्रूझ ड्रग्ज पार्टीवर (Cruise Drug Party) छापा टाकून चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सातत्यानं आरोप करत आहेत. समीर वानखेडे परिधान करत असलेले कपडे आणि घड्याळांची किंमत ५ ते १० कोटींच्या घरात आहे असा खळबळजनक आरोप आज मलिक यांनी केला. त्यावर आता समीर वानखेडे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
"माझ्या महागड्या कपड्यांची केवळ अफवा आहे. मलिक यांनी लोखंडवाला मार्केटमध्ये जावं आणि तिथं कपड्यांचे दर माहिती करुन घ्यावेत. त्यांनी खरी माहिती शोधून काढावी", असा टोला समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांना लगावला आहे. यासोबतच एका ड्रग पेडलकरनं आपल्या कुटुंबाला फसवण्याचा प्रयत्न केला होता असा गौप्यस्फोट देखील वानखेडे यांनी यावेळी केला आहे.
"सलमान नावाच्या एका ड्रग पेडलरनं माझ्या बहिणीशी संपर्क साधला होता. पण माझ्या बहिणीनं वेळीच त्याची केस घेण्यास नकार दिला होता. एनडीपीएस प्रकरणं मी हाताळत नाही असं तिनं त्यावेळी सांगितलं होतं आणि त्याला पळवून लावलं होतं. याच व्यक्तीच्या माध्यमातून माझ्यासह माझ्या कुटुंबाला ट्रॅपमध्ये अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानं एका खोट्या तक्रारीसह मुंबई पोलिसात धाव घेतली होती. पण त्यातून पुढे काहीच झालं नाही", असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.
समीर वानखेडेंनी गेल्या महिन्याभरात ५ ते १० कोटींचे कपडे वापरले आहेत, असा दावा मलिक यांनी केला. वानखेडे २ लाखांचे बूट, ७० हजारांचे शर्ट, ३० हजारांचे टी-शर्ट, १ लाखाची पँट वापरतात. ते वापरत असलेल्या घड्याळ्यांची किंमत २० लाखांपासून १ कोटीपर्यंत आहे, असा खळबळजनक दावा मलिक यांनी केला होता. त्यावर समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
"मलिक यांनी खरंतर लोखंडवाला मार्केटमध्ये जावं आणि कपड्यांची किमतीची माहिती करुन घ्यावी. माझ्या महागड्या कपड्यांची केवळ अफवा आहे. मलिकांनी खरी माहिती शोधून काढावी", असं वानखेडे म्हणाले.
नवाब मलिक यांच्याविरोधात खटला दाखल होणार?नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं समीर वानखेडे यांच्याबाबत आरोप करत आहेत. वानखेडे दलित नसून ते मुस्लिम आहे आहेत आणि त्यांनी खोटा जातीचा दाखला दाखवून नोकरी मिळवली असा आरोप मलिक यांनी केला होता. याच आरोपांसंदर्बात आता समीर वानखेडे सक्रिय झाले आहेत. त्यांनी नुकतीच अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय साम्पला यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रं त्यांच्याकडे सादर केली आहेत. यात वानखेडे यांनी अॅट्रॉसिटी अंतर्गत तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणात लवकरच खटला दाखल करणार असल्याचंही वानखेडे यांनी म्हटलं आहे.