महिला अधिकाऱ्यांसह NCB चे पथक रियाच्या घरी दाखल, अटकेची शक्यता ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 08:29 AM2020-09-06T08:29:22+5:302020-09-06T08:30:39+5:30
रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सॅम्युअलच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास छापेमारी केली. त्यानंतर शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअलला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले,
मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आल्यानंतर एनसीबीने नुकतीच रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि डिलर सॅम्युअल मिरांडाला अटक केली आहे. यानंतर लगेचच रिया चक्रवर्तीला एनसीबीने समन्स धाडण्याची तयारी सुरु केली असून तिच्याही अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच, पुढील तपासासाठी एनसीबीची टीम रियाच्या मुंबईतील घरी पोहचली आहे. त्यामुळे, आता रियाला अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सॅम्युअलच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास छापेमारी केली. त्यानंतर शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअलला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी केली. यावेळी सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. यामुळे त्यांना एनसीबीने त्यास अटक केली आहे. आता, रियाचीही ड्रग्ज डीलप्रकरणात चौकशी होणार असून एनसीबीचे पथक मुंबई पोलिसांसह रियाच्या घरी दाखल झाले आहे. एनसीबीच्या पथकात महिला अधिकारी व महिला पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळे, रियाच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चौकशीत शोविकने रियासोबत ड्रग्जसंबंधी केलेले चॅट खरे असल्याचे कबुल केले आहे. यामुळे शोविकच रियासाठी मोठी अडचण ठरला आहे. या चॅटमध्ये रिया कोणत्यातरी व्यक्तीसाठी शोविककडे ड्रग्ज मागत आहे. यामुळे शोविकच्या म्हणन्यानुसार रियालाही अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सुशांतच्या हत्येच्या आरोपाचा तपास आता वेगळ्याच दिशेने जात असून हत्या की आत्महत्या यावर सीबीआयला उत्तर शोधायचे आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयनेच सुशांतची हत्या केल्याचे पुरावे सापडत नसल्याचे म्हटले होते. यामुळे सीबीआय आता आत्महत्या केली असण्याच्या शक्यतेने तपास करत आहे. सुशांतच्या आत्महत्येमागे कोणती कारणे आहेत याचा शोध घेतला जात आहे.
#SushantSingRajputDeathCase: A team of Narcotics Control Bureau (NCB) arrives at the residence of actor #RheaChakraborty in Mumbai. Police also present at the spot. pic.twitter.com/qGTJlTfSrj
— ANI (@ANI) September 6, 2020
दरम्यान, याआधी ड्रग्ज कनेक्शन संबंधी कपिल झव्हेरी, अब्बास लखानी , फेयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा व करण अरोरा अशी अटक केल्याची नावे आहेत. झव्हेरी व अब्बास यांना मंगळवारी पश्चिम उपनगरातील अड्डयावर छापे टाकून अटक केली. त्यानंतर बुधवारी इतरांना अटक करण्यात आली. हे सर्वजण बॉलिवूड आणि पेज र्थी पार्ट्यामध्ये अंमली पदार्थ पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे.