मुंबई : एनसीबीने धमकी देऊन कोऱ्या पंचनाम्यावर सही करून घेतली, असा आरोप करत स्वतंत्र साक्षीदार सोनू म्हस्के यांनी एनसीबीच्या प्रक्रियेसंदर्भात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची दखल घेण्याची विनंती करणारा अर्ज न्यायालयात केला. म्हस्के याने हा अर्ज विशेष एनडीपीएस न्यायालयात सादर केला आहे. ५ ऑक्टोबर रोजी एनसीबीने पंचनाम्यावर जबरदस्तीने स्वाक्षरी घेतली. फौजदारी गुन्ह्यात अडकविण्याचे व पोलिसांना सहकार्य न केल्याबद्दल अटक करण्याची धमकी एनसीबीने दिल्याचे म्हस्के यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
एनसीबीविरोधात अशा प्रकारे तक्रार करणारा हा दुसरा पंच साक्षीदार आहे. याआधी स्वतंत्र साक्षीदार के. पी. गोसावी याच्या अंगरक्षकानेही एनसीबीने कोऱ्या पंचनाम्यावर स्वाक्षरी घेतल्याचे प्रतिज्ञापत्रावर म्हटले आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अचित कुमार याच्या घरी एनसीबीने धाड टाकली व ड्रग्जही जप्त केले. अचित कुमारच्या इमारतीत म्हस्के फॅसिलिटी मॅनेजर म्हणून काम पाहतात. म्हस्के यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना पंचनाम्यातील मजकूर वाचण्याची संधी देण्यात आली नाही किंवा एनसीबी अधिकाऱ्याने त्यातील मजकूर वाचून दाखवला नाही.१० नोव्हेंबर २०२१ रोजी एनसीबीने जबाब नोंदविण्यासाठी समन्स बजावले. मात्र, एनसीबी अधिकाऱ्यांच्या भीतीमुळे मी जबाब नोंदवण्यासाठी गेलो नाही, असे म्हस्के यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आपल्या मर्जीविरुद्ध जबाब नोंदविण्यात येईल, तसेच जबाब नोंदविण्यासाठी एनसीबी कार्यालयात गेलो नाही तर एनसीबी आपल्याला खोट्या फौजदारी गुन्ह्यात अडकविल, अशी भीती म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.