Join us

Sameer Wankhede: '...तर मला केंद्राकडून परवानगी घ्यावी लागेल'; नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे 'इन अ‍ॅक्शन'!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 8:43 PM

Mumbai Rave Party On Cruise: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याच्या प्रकरणावर राज्याचे मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी एनसीबीवर सुरू केलेल्या आरोपांची मालिका अजूनही सुरूच आहे.

Mumbai Rave Party On Cruise: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याच्या प्रकरणावर राज्याचे मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी एनसीबीवर सुरू केलेल्या आरोपांची मालिका अजूनही सुरूच आहे. नवाब मलिक यांनी आता एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. 

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झालीय असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. 

नवाब मलिकांच्या आरोपावर आता थेट समीर वानखेडे यांनी रोखठोक इशारा दिला आहे. "गेल्या १५ दिवसांपासून आमच्यावर वैयक्तिक हल्ले केले जात आहेत. माझ्या दिवंगत आई, बहिण आणि निवृत्त वडिलांवर टीका केली जात आहे. मी याचा कठोर शब्दांत निषेध व्यक्त करतो", असं समीर वानखेडे म्हणाले. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

नवाब मलिकांनी केलेले आरोप धादांत खोटे आणि निराधार असल्याचं वानखेडे यांनी म्हटलं. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांविरोधीत तुम्ही काही कायदेशीर भूमिका घेणार आहात का? असं विचारण्यात आलं असता समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांना रोखठोक इशारा दिला आहे. 

"मी केंद्र सरकारचा कर्मचारी आहे. मला अशी कोणतीही कारवाई करण्याआधी माझ्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर कायदेशीर मार्गानेच पुढील निर्णय घेतला जाईल", असं समीर वानखेडे म्हणाले. 

नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांनी दुबई आणि मालदीवमध्ये सर्व वसुली केली असल्याचाही आरोप केला होता. त्यावरही वानखेडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. "त्यांनी (नवाब मलिक) नमूद केलेल्या वेळेत मी कधीच दुबईला गेलेलो नाही. मी माझ्या बहिणीसोबत कधीच दुबईला गेलेलो नाही. त्यांनी केलेले सर्व आरोप आणि दावे पूर्णपणे खोटे आहेत", असं वानखेडे म्हणाले. 

...तर मला तुरुंगात टाका"माझ्यावर कितीही खोटे आरोप झाले तरी माझं मनोबल कधीच खचणार नाही. उलट मी आणखी प्रबळ होत जाईन आणि आणखी चांगलं काम करेन. ड्रग्जचं जाळं समूळ उखडण्यासाठी जर ते मला तुरुंगात टाकत असतील तर त्यांनी खुशाल असं करावं. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मी तर एक छोटा सरकारी अधिकारी आहे. ते मोठे मंत्री आहेत", असं समीर वानखेडे म्हणाले. 

टॅग्स :समीर वानखेडेनवाब मलिकनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोआर्यन खान