मुंबई : प्रजासत्ताक दिन शिबिरात दिमाखदार कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या जवान व अधिकाऱ्यांचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कौतुक केले. प्रजासत्ताक दिन परेड व अखिल भारतीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत, पुरस्कारांची लयलूट करणाऱ्या या एनसीसीच्या चमूला राज्यपालांनी पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
महाराष्ट्र एनसीसीच्या ११६ कॅडेट्स व १० अधिकाºयांच्या विजयी चमूच्या सन्मानार्थ राज्यपालांनी राजभवन येथे रविवारी स्वागत समारंभ आयोजित केला होता़ त्यावेळी राज्यपालांनी सदर पुरस्काराची घोषणा केली. राज्य एनसीसीला यंदा पंतप्रधान निशाण स्पर्धेत द्वितीय सर्वोत्तम संचालनालयाचा पुरस्कार प्राप्त झाला. यावेळी राज्य एनसीसीचे प्रभारी अतिरिक्त महासंचालक ब्रिगेडियर राजेंद्रसिंह धैला, विंग कमांडर विक्रम त्यागरामन, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
निधी देवरे हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्वीकारली होती. आदर्श कॅडेटमध्ये सिद्धार्थ रघुवंशीने रौप्य पदक, राजवर्धन देसाईला गार्ड ऑफ हॉनरमध्ये सुवर्ण पदक मिळाले, याशिवाय इतरांनी वैयक्तिक पदके पटकावली.