राष्ट्रवादी राज्यभर आक्रमक; सत्तारांना ‘ते’ शब्द भोवणार? ठिकठिकाणी पुतळे जाळले, काळे फासले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 07:11 AM2022-11-08T07:11:48+5:302022-11-08T07:12:43+5:30
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
मुंबई :
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादीने राज्यात त्यांच्याविरोधात जोरदार संताप व्यक्त केला. काही आक्रमक कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या मुंबई व औरंगाबादेतील बंगल्यावर दगडफेकही केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची कानउघाडणी केली. सत्तार यांनी सायंकाळी आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल माफी मागितली.
सत्तार यांच्याविरोधात सोमवारी राष्ट्रवादीने राज्यभर रान माजवले. या आक्षेपार्ह विधानप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांची २४ तासात मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या पत्रात केली आहे. सत्तार यांच्याविरोधात मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
बंगल्यांभोवती सुरक्षा वाढवली
सत्तार यांच्या निवासस्थानावर दगडफेक झाली. मंत्रालय परिसरात अनेक मंत्र्यांचे बंगले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी मंत्रालय परिसर व मुख्यमंत्री शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून समज
सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिंदे गटही अडचणीत आला आहे. याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तार यांना फोन करून त्यांची कानउघाडणी केल्याचे समजते. यापुढे अशी वादग्रस्त विधाने करू नका, असे शिंदेंनी बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य महिला आयोगाकडे तक्रार
सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली आहे. याप्रकरणी कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आयोगाकडून पोलीस महासंचालकांनी सांगण्यात आले.
अहमदनगर शहरात कृषिमंत्री सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे साेमवारी सायंकाळी दहन करण्यात आले. सत्तार यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. महिला आघाडीने दिल्लीगेट येथे सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे जोडे मारून दहन केले. कोपरगाव, राहुरी, जामखेड येथेही पुतळ्याचे दहन करण्यात आले.
जळगावात राष्ट्रवादीकडून सत्तारांच्या विरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले. आकाशवाणी चौकात जोरदार घोषणाबाजी करत पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको केला. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी सत्तारांच्या फोटोला काळं फासत त्यांचा निषेध करण्यात आला.
सत्तार म्हणाले, सॉरी
सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वापरलेले आक्षेपार्ह शब्द मागे घेत सत्तार यांनी माफी मागितली . मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. खासदार सुप्रिया सुळे किंवा कोणत्याच महिलेबद्दल मी काहीच बोललो नाही. माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील तर मी खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो, असे सत्तार म्हणाले.
अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह आहे. महिला लोकप्रतिनिधींविषयी गलिच्छ भाषेत बोलून सत्तार यांनी त्यांच्या मागास मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्वरित त्यांचा राजीनामा घ्यावा.
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस