Join us  

“सर्वांची सहनशीलता संपली, तुमच्या मनासारखं करू”; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना शब्द!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 3:06 PM

NCP Ajit Pawar:शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यावर अनेक नेते, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.

NCP Ajit Pawar: लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना अचानक शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यानंतर एकच गोंधळ उडाला. अनेक नेते, कार्यकर्ते मंचावर जात शरद पवार यांची समजूत काढू लागले.

शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती सर्वच उपस्थित नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी केले. प्रसंगी निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत उपोषणाला बसू, अन्न-पाणी त्यागू, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. शरद पवार यांचा हा निर्णय समजताच राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले होते. सर्वच जण शरद पवार यांना आजच निर्णय मागे घ्यावा, असा आग्रह धरत होते. यातच अजित पवार उठले आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. 

तुमच्या मनासारखं करू

सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी शरद पवार साहेबांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आता सर्वांची सहनशीलता संपलेली आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, आता शरद पवार साहेबांना इथून जाऊ द्या. थोड्यावेळाने आम्ही साहेबांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतो. शरद पवार साहेबांनी जो निर्णय घेतला, त्यावर आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. सर्वांच्या भावना तीव्र आहेत. वेगवेगळ्या मतदारसंघातून कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचत आहेत. या निर्णयामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांची मत ते तिथे व्यक्त करत आहेत. मात्र, आता शरद पवार साहेबांशी चर्चा करून तुमच्या मनासारखा मार्ग काढण्याचे करू, असे आश्वासन देत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. 

दरम्यान, तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्याही सभागृहात आल्या. मलिक तुरुंगात गेल्यानंतर तुम्ही आमच्या पाठिशी ठामपणे उभे राहिलात. तुम्हीच आम्हाला आधार दिलात. अद्यापही तुम्ही वडिलांप्रमाणे आमच्यासाठी करत आहात. तुम्ही आम्हाला हवे आहात, असे सांगत निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी मलिकांच्या कन्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार