Join us

धनगर समाजाच्या आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे का? छगन भुजबळांचे सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 1:33 PM

Chhagan Bhujbal: ओबीसी आरक्षण वाचवणे हाच माझ्यापुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे छगन भुजबळांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal: एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून सरकारला अल्टिमेटम देण्यात आला आहे. मराठा लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी ठोस भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरू लागली आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. यातच धनगर आरक्षणाबाबतछगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 

बाळासाहेब सराटे यांनी २७ टक्के ओबीसी आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट करताना, मराठा आरक्षणाला विरोध नाही. तुम्ही त्यांना वेगळे आरक्षण द्या. कायद्यात काही त्रुटी राहिल्या असतील, त्या दुरुस्त करा. आम्ही तुमच्या बाजूने उभे राहू. मात्र, सर्रास पाहिजे, सरसकट पाहिजे. आता राज्यभरात कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यालये उघडली आहेत. हे आरक्षण फार प्रयासाने मिळवले आहेत. हे आरक्षण संपवण्याचा घाट घातला गेला आहे, या शब्दांत छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी पत्रकारांनी धनगर आरक्षणाच्या मागणीबाबत प्रश्न विचारला.

धनगर समाजाच्या आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे का?

धनगर समाजाचे तुम्ही नेते आहात. आता धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी सुरू आहे. या धनगर समाजाच्या आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर, माझ्या पुढे आता सगळ्या ओबीसीमधील जे आरक्षण आहे, साळी, माळी, कोळी, वंजारी, जे काही असेल, त्यांचे आरक्षण वाचवणे हाच माझ्यापुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान,  राज्यभरात सुरू केलेल्या कार्यालयात या आणि कुणबी प्रमाणपत्र घेऊन जा, हे जे चाललेले आहे, ते चुकीचे आहे. खरोखर जे कुणबी आहेत, त्यांना आमचा विरोध नाही. पण जे चुकीच्या मार्गाने घुसत आहेत, त्यांना आमचा विरोध आहे. त्यांनी मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, याचा पुनरुच्चार छगन भुजबळ यांनी केला. कुणबी प्रमाणपत्र मिळाले तरी ओबीसीमध्ये दाखल होऊ शकत नाही, हा संभ्रम कसा तो आधी दूर करावा, ते आधी सांगावे, मग प्रश्न मिटेल, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.  

टॅग्स :छगन भुजबळओबीसी आरक्षणधनगर आरक्षण