NCP विरोधात काम करायला पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीतून पाठवण्यात आले होते; तटकरेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 04:58 PM2023-11-28T16:58:00+5:302023-11-28T17:02:00+5:30
Sunil Tatkare Replied Prithviraj Chavan: पृथ्वीराज चव्हाणांमुळे राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली आहे.
Sunil Tatkare Replied Prithviraj Chavan: मराठा आरक्षणावरून राज्यात तीव्र टोकाचे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार पाडले. तसे घडले नसते तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तेव्हाच मिटला असता, असा मोठा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. याला आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले.
सहकार क्षेत्रात घेतलेल्या कडक निर्णयामुळे माझे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ मध्ये पाडले. मला खात्री आहे की माझे सरकार जर पडले नसते. तर आम्ही दोघे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो असतो आणि २०१४ मध्ये भाजपऐवजी आमचेच सरकार आले असते आणि मराठा आरक्षणाचा प्रश्नही सोडविला असता, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना उत्तर दिले.
NCP विरोधात काम करायला पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीतून पाठवण्यात आले होते
पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ राजकारणी आहेत, असे इतके दिवस मानत होतो. परंतु अलीकडे त्यांना हा विनोद का सुचला हे माहिती नाही. २०१४ मध्ये मंत्रिमंडळात होतो. राणे समिती नेमली गेली आणि मराठा समाजाला आरक्षण दिले गेले. मात्र ते उच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे २०१४ सत्ता गेल्यावर ते टिकले नाही किंवा राष्ट्रवादीमुळे टिकले नाही हे बोलण्यामागे त्यांचा हेतू काय आहे हे कळू शकले नाही, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. तसेच एक बाब नक्की आहे की २०१४ मध्ये काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसने मागितलेल्या जागांवर पहिले उमेदवार जाहीर केले. मी त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होतो. आम्हाला गाफील ठेवून कुठल्या जागा हव्यात याची माहिती काढून घेतली परंतु आतापर्यंतचा प्रघात आहे की निवडणूकपूर्व दोन राजकीय पक्षांची युती किंवा आघाडी होत असते त्यानंतर यादी घोषित करतात. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम करण्यासाठी सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आले होते, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना केला.
दरम्यान, निवडणूक पूर्व युती होऊ शकली नाही. त्यानंतर मी आणि प्रफुल्ल पटेल व अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन निवडणूकासोबत लढणार नसू तर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती त्यामुळे सत्तेला चिकटून राहण्याला अर्थ नव्हता म्हणून सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय शिर्षस्थ नेतृत्वाकडे चर्चा करून घेतला होता. काँग्रेस राज्यात चौथ्या क्रमांकावर गेली त्याला कारण पृथ्वीराज चव्हाण आहेत, असा थेट हल्लाबोल सुनील तटकरे यांनी केला.