Sunil Tatkare Replied Sanjay Raut: एकीकडे आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे आमदार अपात्रता सुनावणीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातील गटांनी अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. पैकी शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकांवर सध्या नियमितपणे सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
लोकसभा निवडणुकांच्या आधी पाच राज्यातील निवडणुका होत आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन्य राज्यात जाऊन भाजपचा प्रचार केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते असा प्रचार करताना दिसले नाहीत. अजित पवार गटात अनेक बडे नेते आहेत. मात्र, पाच राज्यातील निवडणुकांमध्ये होणाऱ्या प्रचारात त्यांना डावलले जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. याला सुनील तटकरे यांनी उत्तर दिले.
सुनील तटकरेंचा संजय राऊतांना सल्ला
आम्हाला कुठे डावलले जाते यावर फार लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता संजय राऊत यांना नाही. त्यांनी त्यांचा पक्ष कसा सावरायचा, लोकसभा निवडणुकीला कसे सामोरे जायचे यावर अधिक लक्ष केंद्रित केले तर बरे होईल, असा सल्लाही सुनील तटकरे यांनी यावेळी दिला. भाजप वेगवेगळ्या राज्यातील निवडणुका लढत आहे. केंद्र सरकार तसेच भाजपच्या वतीने झालेली कामे आणि त्याचा प्रचार करण्यास ते सक्षम आहेत. आम्ही महाराष्ट्रात एनडीएचे घटक आहोत, त्यामुळे उर्वरित राज्यात प्रचाराला गेलेच पाहिजे असे मानण्याचे कारण नाही, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सरकारमध्ये सहभागी असून, जर मंत्री व्यासपीठावर जाऊन आपली भूमिका मांडत असेल तर मंत्रिमंडळात त्यांनी ही भूमिका मांडायला हवी. मंत्रिमंडळात भूमिका मांडता येत नसेल तर समन्वय नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. यावर बोलताना, मंत्रिमंडळात भुजबळ यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांना मंत्रिमंडळाचे कामकाज पूर्ण ज्ञात आहे. ते स्पष्ट वक्ते आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळात भूमिका मांडली असेल. मात्र एखादे नेतृत्व जेव्हा वेगवेगळ्या कारणांनी समाजासमोर जात असते, त्यावेळी त्यांना ती भूमिका मांडावी लागतच असते. मंत्रिमंडळ आणि त्याविषयी असलेले विषय हा एक भाग झाला आणि मंत्रिमंडळाबाहेर जे काम असते त्यावर मोकळेपणे बोलण्याचा अधिकार त्यांना आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.