Mankhurd Shivaji Nagar Assembly constituency : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अखेरच्या क्षणी नवाब मलिक यांना विधानसभेचे उमेदवार केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शेवटची पाच मिनिटे उरलेली असताना नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसक पक्षाकडून मिळालेला एबी फॉर्म निवडणूक अर्जासोबत जमा केला आहे. त्यामुळे आता नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदार ठरले आहे. यावेळी मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघात आपण विजयी होऊ असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
नवाब मलिक यांचा निवडणूक लढविण्याबाबतचा सस्पेंस संपला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते अधिकृतरित्या निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांनी उमेदवारी दिली असून ते आता घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. मानखुर्द शिवाजीनगरमधून राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना तिकीट दिले आहे. एबी फॉर्म मिळाल्यानंतर नवाब मलिक यांनी अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
नवाब मलिक हे अजित पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार की अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार याबाबत सस्पेंस होता. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म मिळालेला नव्हता, त्यामुळे ते अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतील, अशी चर्चा सुरु होती. मात्र, नंतर त्यांना राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म मिळाला आणि अजित पवार गटाचे उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नवाब मलिक महायुतीसोबत आल्यापासून भाजपमध्ये नाराजी होती. मात्र आता तर थेट उमेदवारी दिल्याने भाजप नेते काय करणार असा सवाल विचारला जात आहे.
"आज मी मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. मी अपक्ष उमेदवार म्हणूनही फॉर्म भरला आहे. पण पक्षाने एबी फॉर्म पाठवला आहे आणि आम्ही तो दुपारी २.५५ वाजता जमा केला आहे. त्यामुळे आता मी अधिकृत राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा मी मनापासून आभारी आहे.त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. तसेच मोठ्या प्रमाणात मतदार मला नक्कीच साथ देईल. यावेळी मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघात आपण विजयी होऊ असा मला पूर्ण विश्वास आहे," असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
दरम्यान,अणुशक्तीनगरचे आमदार नवाब मलिक यांना तिकीट न देण्यासाठी भाजपकडून सातत्याने दबाव आणला जात होता. या दबावामुळेच अजित पवार यांनी सुरुवातीला या जागेवरून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिकला उमेदवारी दिली. त्यानंतर मलिक यांनी मानखुर्दमधून उमेदवारी दाखल करण्याची घोषणा केली. नवाब यांच्या या भूमिकेनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आम्ही कोणत्याही दाऊद समर्थकाला उमेदवार बनवू शकत नाही, असे जाहीरपणे सांगितले होते.