Join us  

Maharashtra Political Crisis: “दुसऱ्या पक्षाचा म्हणून कधीच भेदभाव केला नाही”; अजित पवारांनी हिशोबच मांडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 1:23 PM

बंडखोर आमदारांना नेमका किती निधी दिला, याची आकडेवारीच अजित पवार यांनी सभागृहात वाचून दाखवली.

मुंबई: ज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर विश्वासमत चाचणीसाठी बोलावण्यात आलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सत्ताधारी पक्षातील देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षातील अजित पवार यांच्यात जोरदार जुगलबंदी दिसून आली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासमत जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचे भाषण करताना, सत्ता गमावलेल्या महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच मविआ सरकारच्या काळात घडलेल्या विविध घटनांवरून टोले लगावले. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच यावेळी बंडखोर आमदारांनी निधिबाबत सातत्याने केलेल्या टीकेचा समाचार घेत अजित पवार यांनी कोणला किती निधी दिला, याचा हिशोबच सभागृहासमोर मांडला. 

महाविकास आघाडी होताना बऱ्याच गोष्टी घडल्या. खरे तर एकनाथ शिंदे यांचेच नाव आघाडीवर होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी, असे ठरले आणि महविकास आघाडीचे सरकार आले. मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यापासून त्यांनी शिवसेनेच्या मदतीने आपला पक्ष वाढवला. १९८० मध्ये भाजपचे १४ आमदार निवडून आले होते. यानंतर १६ झाले. १९९५ ला ४२ वरून भाजपच्या आमदारांची संख्या ६५ वर गेली. १९९९ ला ५६ झाले. २००४ ला ५४ झाले. २००९ ला ४६ झाले आणि २०१४ रोजी चार पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढल्यानंतर १२२ आमदार भाजपचे निवडून आले. त्यानंतर २०१९ ला १०५ आमदार निवडून आले. याचाच अर्थ भाजपने शिवसेनेत राहून स्वतःची चांगली प्रगती केली. प्रत्येक जण आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतच असतो, असे अजित पवार म्हणाले. 

दुसऱ्या पक्षाचा म्हणून आम्ही कधी भेदभाव केला नाही

शिवसेनेतून मोठा गट बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर अन्याय केला, याचा मोठ्या प्रमाणात पाढा वाचण्यात आला. मात्र, भाजपतील अनेक नेत्यांनाही ही गोष्ट माहिती आहे की, मी कोणाहीबद्दल असा भेदभाव कधीच करत नाही. आमदारांचा निधी १ कोटीवरून ५ कोटी केला. यातही भेदभाव केला नाही. नगरविकास खात्याला पहिल्या वर्षी ३ हजार ६१ कोटी दिले. त्यानंतर २ हजार १७७ कोटी दिले. त्यानंतरच्या वर्षी ४ हजार ५२ कोटी दिले. महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून १२ हजार कोटींच्या वर निधी दिला. 

बंडखोर आमदारांना नेमका किती निधी दिला?

सुमारे १२०० पैकी ४०० च्या वर शिवभोजन केंद्रे शिवसेना आमदारांच्या शिफारसीवरून मंजूर केली. एकनाथ शिंदे यांना मतदारसंघासाठी ३६६ कोटींचा निधी दिला. संदिपान भुमरे यांना १६७ कोटी, उदय सामंत यांना २२१ कोटी, दादा भुसे ३०६ कोटी, गुलाबराव पाटील ३०९ कोटी, शंभुराज देसाई २९४ कोटी, अब्दुल सत्तार २०६ कोटी, अनिल बाबर १८६ कोटी, महेश शिंदे १७०, शहाजी बापू पाटील १५१ कोटी, महेंद्र थोरवे १५४ कोटी, अशी एक यादीच अजित पवार यांनी सभागृहात वाचून दाखवली. 

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा