Join us  

“राज्यातील दुरावस्थेला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार नाही का”; अजित पवारांनी विचारला जाब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 9:07 PM

Ajit Pawar Vajramuth Sabha Mumbai Live: वज्रमूठ सभेतून बोलताना अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Ajit Pawar Vajramuth Sabha Mumbai Live: राज्यात प्रसिद्धीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. बेस्टच्या बसेसवर फोटो चिकटवले जात आहेत. मात्र, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली जात नाही, अशी टीका करत राज्याची जी अवस्था झाली आहे, त्याला शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार जबाबदार नाही का, अशी थेट विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. ते महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत बोलत होते. 

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असली तरी ती सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. शिवसेनेमुळे मुंबई टिकली. हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ठोस भूमिका घेतल्यामुळे मुंबईतील मराठी माणसांचा अभिमान आणि स्वाभिमान कायम राहिला. शिवसेनेचे काम काहींच्या डोळ्यावर आले आणि म्हणूनच काहींना फोडण्याचे राजकारण करण्यात आले. असेच जर सुरू राहिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि देशाची घटना अबाधित कशी राहणार, अशी विचारणा अजित पवार यांनी केली.  

जनता आपल्यासोबत आहे, एकत्र राहण्याची गरज आहे

राज्यातील जनता आपल्यासोबत आहे. एकजूट राहून एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. सोनिया गांधी, शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. कोरोनाच्या कठीण काळातही आर्थिक शिस्त कधीही मोडली नाही. बहुतांश कामे योग्य पद्धतीने आणि सुरळीत ठेवली. मात्र, आताचे सरकार योग्य पद्धतीने काम करत नाही. ३१ मार्च रोजी कोट्यवधी रुपयांची बिले थकलेली आहेत. कंत्राटदारांना थांबण्याच्या सूचना केल्या जात आहेत. चेक वठत नाहीत, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री याला जबाबदार नाही का, असा सवाल अजित पवार यांनी केला.  

शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम आपल्याला करायचे आहे

राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. आणखी काही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अशात अनेक शेतकऱ्यांचे पीक, फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. मात्र, त्यांना मदत करण्याची मानसिकता या सरकारची दिसत नाही. राज्यातील बळीराजाला आधार देण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे अजित पवार यांनी नमूद केले. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था राखली जात नाही. महागाई आणि बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यावर सरकार बोलायला तयार नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.

देखो महाराष्ट्रवरून शिंदे सरकारला टोला

देखो महाराष्ट्र म्हणत जाहिराती केल्या जात आहेत. मराठीतून नीट देता येत नाही का, देखो काय देखो, पाहा आपला महाराष्ट्र असे लिहायचे होते, असा सल्ला देताना आता यांच्याकडे पाहण्याची वेळ आली आहे.निवडणुका सरकार घेत नाही. सरकारला भीती कशाची वाटते, असा सवाल करत, निवडणुका जाहीर झाल्यावर जनता काय करेल, याची भीती सरकारला वाटत असल्यामुळे निवडणुका घेतल्या जात नाहीत, असा दावा अजित पवार यांनी केला.  दरम्यान, यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. ज्यांच्यात निवडून येण्याची क्षमता असेल, असेच उमेदवार महाविकास आघाडीतून देण्यासंदर्भात काम करायला हवे. टीमने काम करायला हवे. कार्यकर्त्यांनी तशी मानसिकता ठेवायला हवी, असे अजित पवार यांनी सांगितले. वाचाळवीरांची संख्या वाढली आहे, अशी टीका करताना आतापर्यंत महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन झाले. पण जाहिरातींवर एवढा खर्च झाला नाही, आकडेवारी काढून पाहा. सरकारच्या पाताळयंत्री कारवाया सुरू आहेत. अशाने लोकशाही कशी जिवंत राहणार. अनेक गोष्टी पसरवल्या जात आहेत, त्यावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती अजित पवार यांनी यावेळी बोलताना केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :अजित पवारमहाविकास आघाडीराष्ट्रवादी काँग्रेस