मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाबलीपूर येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता केली होती. महाबलीपूरमच्या समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असताना त्यांनी समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिकचा कचरा गोळा केला होता. मात्र यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
अमोल कोल्हे म्हणले की, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्राच्या किनाऱ्यावरील कचरा उचलून स्वच्छता करत होते. देशाचे पंतप्रधानांनी कचरा उचलल्याने त्यांचे अभिनंदन आहे. परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेचा कचरा झाला आहे. तसेच तरुणांच्या रोजगाराचा कचरा, शेतकऱ्यांचा भवितव्याचा कचरा झाला असून पंतप्रधान मोदी यावर का बोलत नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. पुण्यातील दौंड येथील सभेत अमोल कोल्हे बोलत होते.
नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (12 ऑक्टोबर) सकाळी महाबलीपूरम येथील समुद्र किनाऱ्यावर जवळपास अर्धा तास कचरा गोळा केला. प्लास्टिकची पाकिटं, बाटल्या आणि इतर कचरा मोदींनी गोळा करून साफसफाई केली आहे. तसेच व्हिडीओ पोस्ट करून सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे असं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे आपण सर्वांनीच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.