Join us  

Rajya Sabha Election 2022: “चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाला महाविकास आघाडीच्या विजयाचे सर्वांत मोठे गिफ्ट मिळेल”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 2:23 PM

Rajya Sabha Election 2022: तुम्ही शकूनी मामासारखे फासे टाकत राहा. कुरुक्षेत्रावरील युद्ध श्रीकृष्ण जिंकून देणार, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) मतदान पार पडत आहे. एकेका मतासाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंचे आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून, या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अखेर २४ वर्षांनंतर राज्यसभेची निवडणूक होत आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या राज्यसभा विजयाचे मोठे गिफ्ट मिळेल, असा खोचक टोला लगावला आहे. 

सत्ताधारी महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून निरनिराळे दावे केले जात आहेत. विशेषत: सहाव्या जागेवर नेमका कोणता उमेदवार निवडून येणार? याची देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, शरद पवारांवर मुख्यमंत्री नाराज नसून, महाविकास आघाडीमध्ये एकमत असल्याचा दावा केला आहे. यातच आता अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

भाजपाकडून अफवा पेरल्या जात आहेत

महाविकास आघाडी सरकारमध्ये आज चारही जागेवर आमचे उमेदवार निवडून येतील. भाजपाकडून काही बातम्या पेरल्या जात आहेत की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वितुष्ट आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. महाविकास आघाडीचे राज्यसभेचे सर्व उमेदवार निवडून येतील. चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचे हे सर्वांत मोठे गिफ्ट सायंकाळपर्यंत मिळेल, असा खोचक टोला मिटकरी यांनी लगावला. तसेच भाजपने अनिल बोंडे यांची अवस्था महाभारतातील शकुनी मामासारखी करुन ठेवली आहे. तुम्ही फक्त आपल्या गटार वाणीतून "भांजे" म्हणत फक्त पासे टाकत राहा कुरुक्षेत्रावरील युद्ध श्रीकृष्ण जिंकून देणार, या शब्दांत मिटकरी यांनी टीकास्त्र सोडले. 

दरम्यान, सर्वच पक्षांकडून गटागटाने आमदार विधानभवनात येऊन मतदान केले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मतांचा कोटा ४२ वरून ४४ केल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, शिवसेनेच्या नाराजीनंतर त्यांनी पुन्हा निर्णय बदलून तो ४२ केल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली होती. आकडेवारीनुसार, काँग्रेसकडे दोन, राष्ट्रवादीकडे (नवाब मलिक आणि अनिल देशमुख वगळता) ९ तर शिवसेनेकडे १३ अतिरिक्त मते आहेत. शिवाय चार अपक्ष आमदारही सरकारच्या बाजूने मत देण्याची शक्यता आहे. तीन पक्षांची मिळून २४ अतिरिक्त मते महाविकास आघाडीकडे असली, तरी त्यावरची १८ मते सहाव्या जागेचा निकाल फिरवू शकतात. 

टॅग्स :राज्यसभामहाविकास आघाडीअमोल मिटकरीभाजपाचंद्रकांत पाटील