Join us  

Maharashtra Political Crisis: “विश्वास आहे... शिंदेसाहेब भाजपची जनमानसातील उरली सुरली लोकप्रियता लवकरच संपवतील”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 2:48 PM

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांचा नंबर घसरत चालल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून नव्या सरकारवर टीकास्त्र सोडले जाताना दिसत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या जोडीवर स्तुतिसुमने उधळली जात असताना, दुसरीकडे मात्र, एकनाथ शिंदे भाजपचे मुख्यमंत्री असल्याची टीका करण्यात येत आहे. यात आता राष्ट्रवादीनेही नव्या सरकारवर निशाणा साधत, शिंदेसाहेब भाजपची जनमानसातील उरली सुरली लोकप्रियता लवकरच संपवतील, या शब्दांत आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी हल्लाबोल केला आहे. 

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपने राजकीय वर्तुळाला मोठा धक्का दिला. मात्र, अवघ्या काही मिनिटांत देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावून आणखी एक धक्का दिला. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपवर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करून भाजपला डिवचले आहे. 

भाजपची जनमानसातील लोकप्रियता लवकरच संपवतील

अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सद्यस्थिती महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस दुसऱ्या, चंद्रकांत पाटील तिसऱ्या तर इतर भाजप नेते चौथ्या व पुढच्या नंबरवर फेकले गेलेत. विश्वास आहे शिंदेसाहेब भाजपची जनमानसातील उरली सुरली लोकप्रियता लवकरच संपवतील, असा खोचक टोला लगावला आहे. 

दरम्यान, यापूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये संयुक्त महाराष्ट्रावेळी हौतात्म्य पत्करलेल्यांचे स्मरण करत त्याचा संबंध आताच्या राजकारणाशी जोडला आहे. त्यातून मुंबई गुजरातला नेण्यासंदर्भात भाजपवर आरोप केले आहेत. या ट्विटमध्ये अमोल मिटकरी म्हणतात, १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मुंबई गुजरातला जाऊ दिली नाही! १०६ जण आता तीच मुंबई गुजरातला मिळवून देण्यासाठी दिवस-रात्र झटत आहे! असे म्हटले आहे. या ट्विटला अमोल मिटकरी यांनी, मनाला पटतंय बघा, असे कॅप्शनही दिले आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळअमोल मिटकरीराष्ट्रवादी काँग्रेसएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस