मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर दुसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. यातच आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सत्तेत येतील आणि विठ्ठालाची महापूजा करतील, असा कयास भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांकडून बांधला जात आहे. मात्र, यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तुम्ही कितीही आततायीपणा करा, तुमचा मुख्यमंत्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार नाही, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वारकरी मेळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील यांनी परिधान केलेल्या वारकरी वेषाबाबतही राष्ट्रवादीकडून टीकास्त्र सोडण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी यावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
तुमचा मुख्यमंत्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार नाही
वारकरी सांप्रदायाचे तत्त्व पाळत नसाल तर कपडे घालून वारकरी होण्याचे ढोंग करू नका. तुम्ही कितीही आततायीपणा केला तरी तुमचा मुख्यमंत्री विठ्ठलाची शासकीय महापुजा करणार नाही. कृपा करून वारकरी संप्रदायाला सुरक्षित राहू द्या. बदनाम करु नका, या शब्दांत अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
...तोपर्यंत भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही
काही झाले तरी आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. भाजपसोबत जाण्याचा प्रश्न नाही, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले. शरद पवार यांनी आमदारांशी चर्चा करून त्यांचे अभिप्राय विचारले, मनातील भावना जाणून घेतल्या असेही ते म्हणाले. गुजर जायेगा ये दौर भी, जरा सा इत्मिनाना तो रख.. जब खुशियाँ ही नही ठहरी, तो गम की क्या औकात हैं.. असा शेर अमोल मिटकरी यांनी ट्विट केला होता. याविषयी बोलताना, आताच्या घडीला राज्यावर आणि महाविकास आघाडी सरकारवर संकट आहे. शिवसेनेच्या बंडखोरांना भाजप रसद पुरवत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दिल्लीतून हे सगळे फंडिंग होत आहे, असेही सांगितले जात आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी जोपर्यंत शरद पवार मैदानात आहेत, तोपर्यंत भाजपचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.