Amol Mitkari on Eknath Shinde: “जोपर्यंत शरद पवार आखाड्यात आहेत, तोपर्यंत भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही”: अमोल मिटकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 04:01 PM2022-06-22T16:01:49+5:302022-06-22T16:02:52+5:30
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अलर्ट झाले असून, आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश शरद पवारांनी दिल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर दुसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. शिवसेनेने परत येण्यासाठी अल्टिमेटम दिलेले आहे. मात्र, दुसरीकडे एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. उलटपक्षी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढत असून, शिवसेनेतील आणखी काही आमदार गुवाहाटीला गेल्याचे समजते. यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी अलर्ट झाली आहे. तर, जोपर्यंत शरद पवार महाविकास आघाडीच्या आखाड्यात आहेत, तोपर्यंत भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटले आहे.
शिवसेनेतील बंडाळीनंतर आणि त्यानंतरच्या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सतर्क झाली असून, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच काही आमदारांची यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठकही घेतली. या बैठकीनंतर अमोल मिटकरी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला.
...तोपर्यंत भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही
मूळात जनतेचा कौल हा आम्ही विरोधी पक्षात बसण्याचा होता. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याचे आपण सर्वांनीच पाहिले. हे तीन पक्षांचे सरकार आहे. काही झाले तरी आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. भाजपसोबत जाण्याचा प्रश्न नाही, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले. शरद पवार यांनी आमदारांशी चर्चा करून त्यांचे अभिप्राय विचारले, मनातील भावना जाणून घेतल्या असेही ते म्हणाले. गुजर जायेगा ये दौर भी, जरा सा इत्मिनाना तो रख.. जब खुशियाँ ही नही ठहरी, तो गम की क्या औकात हैं.. असा शेर अमोल मिटकरी यांनी ट्विट केला होता. याविषयी बोलताना, आताच्या घडीला राज्यावर आणि महाविकास आघाडी सरकारवर संकट आहे. शिवसेनेच्या बंडखोरांना भाजप रसद पुरवत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दिल्लीतून हे सगळे फंडिंग होत आहे, असेही सांगितले जात आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी जोपर्यंत शरद पवार मैदानात आहेत, तोपर्यंत भाजपचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. आमच्याकडे सुमारे ४५ आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे आता आम्ही शिवसेना आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर दिवंगत आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार पुढे जात आहोत, असा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.