'ट्रोलिंगसाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेनं प्रचंड फेक अकाऊंट तयार केलेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 02:38 PM2020-06-23T14:38:49+5:302020-06-23T14:39:46+5:30
सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला आदर्श मानत त्यांच्याप्रमाणेच फडणवीस हेही सोशल मीडियावरुन जनतेशी कायम संपर्कात असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांना सोशल मीडियात ट्रोल करण्यात आले आहे. यासंदर्भात एका मुलाखतीत प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेक अकाऊंटबाबत माहिती दिली. तसेच, शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रचंड फेक अकाऊंट असल्याचंही त्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राज्यातील सध्याची कोरोना परिस्थिती, राजकारण, देशाची आर्थिक परिस्थिती आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगवरही त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण फॉलो करता, पण नरेंद्र मोदी कधीच कुणाला ब्लॉक करत नाहीत. मग, आपण सोशल मीडियावर काहीजणांना का ब्लॉक करता? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना आम्ही कधीच कुणाला ब्लॉक करत नाही. मात्र, फेक अकाऊंटच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक ट्विट किंवा पोस्टवर जाणीवपूर्वक गचाळ भाषेत, वाईट आणि द्वेषात्मक कमेंट करण्यात येत आहेत. त्यामुळे, आमच्याकडून केवळ अशा फेक अकाऊंटन्सा ब्लॉक करण्यात आले आहे. वैचारिक पातळीवर चर्चा असेल, खरं अकाउंट असेल तर आम्ही उत्तर देऊ, मुद्दा पटवून सांगू. मात्र, फेक अकाऊंटद्वारे नाहक वाईट आणि गलिच्छ टिपण्णी करणे योग्य नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
सोशल मीडयाव सध्या 1.5 लाख फेक अकाऊंट आहेत. काँग्रेसचे फेक अकाउंट जास्त नसून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रचंड फेक अकाऊंट असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. या फेक अकाऊंटवरुन ट्रोलिंग करण्यात येत आहे. महाराष्ट्र बचाव आंदोलनावेळी ट्विटर ट्रेडिंगमध्ये आमच्या आंदोलनाचे ट्विट होते. मात्र, या पक्षांच्या समर्थकांनी फेक अकाउंट तयार करुन आंदोलनाविरुद्ध मोहीम सुरु केली. यातूनच हे फेक अकाऊंट उघड झाले असून तेच फेक अकाऊंट आमच्याकडे ब्लॉक झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.