अनिल देशमुख यांना जामीन, तूर्त तुरुंगातच; ईडी सर्वोच्च न्यायालयात जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 06:26 AM2022-10-05T06:26:43+5:302022-10-05T06:27:28+5:30
कथित १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ११ महिन्यांपासून आर्थररोड कारागृहात असलेले अनिल देशमुख यांना अखेरीस जामीन मंजूर झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कथित १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ११ महिन्यांपासून आर्थररोड कारागृहात असलेले राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेरीस उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, देशमुख यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झालेला नाही. त्यामुळे देशमुख यांचा मुक्काम आर्थररोड कारागृहातच राहणार आहे.
न्या. एन. जे. जमादार यांच्या एकलपीठाने देशमुख यांचा जामीन मंजूर केला असला, तरी ईडीने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी या आदेशावर स्थगिती देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य करत, देशमुख यांच्या जामीन आदेशावर १३ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली. देशमुख कुटुंबांच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टच्या खात्यातील दोन व्यवहार ईडीने ध्वजांकित केले होते. ती रक्कम गुन्ह्यातून मिळविलेली नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण न्या. जमादार यांच्या एकलपीठाने नोंदविले. न्यायालयाने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या साक्षीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्याशिवाय न्यायालयाने पीएमएलए कायद्याच्या कलम ४५चा लाभही देशमुख यांना दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"