“संतोष देशमुख प्रकरण फास्टट्रॅकला चालवा, दोषींना फाशी द्या”; धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:08 IST2025-01-02T14:08:29+5:302025-01-02T14:08:44+5:30
NCP AP Group MLA Dhananjay Munde News: मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित झालेल्या धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरणात स्पष्ट भूमिका मांडली. तसेच पालकमंत्रीपदाबाबत महत्त्वाचे विधान केले.

“संतोष देशमुख प्रकरण फास्टट्रॅकला चालवा, दोषींना फाशी द्या”; धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
NCP AP Group MLA Dhananjay Munde News: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दिवसेंदिवस राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयित वाल्मीक कराड तपास यंत्रणेला शरण आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचे बोलले जात आहे. यातच वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचा संबंध जोडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी विरोधक चांगलेच आक्रमक झाले असताना धनंजय मुंडे यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत भूमिका व्यक्त केली आहे.
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाल्यानंतरची पहिलीच मंत्रिमंडळ बैठक होती. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला अनेक मंत्री उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित नव्हते. यानंतर पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरणी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.
संतोष देशमुख प्रकरण फास्टट्रॅकला चालवा, दोषींना फाशी द्या
पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, छोटा आका, मोठा आका, कुणाचा एन्काउंटर अशा गोष्टी प्रथमच ऐकत आहे. सीआयडी अतिशय व्यवस्थितपणे तपास करते. दिवंगत संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली आहे, त्यांना फास्टट्रॅक कोर्टात नेऊन फासावर चढवणे हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे. बाकी कुठल्या चर्चांना अर्थ नाही. हे प्रकरण फास्टट्रॅकमध्ये नेले पाहिजे, ही मागणी मीच सर्वप्रथम केली होती. नागपूरच्या अधिवेशनात ही मागणी केली होती. यातील आरोपींना लवकरात लवकर पकडून चार्जशीट दाखल करावी. फास्टट्रॅक कोर्टात या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. या तपासात कोणाचाही प्रभाव पडू नये, यासाठी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी, अशा तीनही प्रकरच्या चौकशा सुरू आहेत. ही घटना दुर्दैवी असून, यात जे कुणी दोषी असतील, हीच भूमिका सर्वपक्षीय एकवटलेल्या आमदारांची आणि अन्य सर्वांची आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पालकमंत्रीपदाबाबत अजित पवार निर्णय घेतील, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.