मुंबई: ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांची भूमिका करणारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) नव्या वादात सापडले आहेत. त्यांचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे खासदार असताना गांधींची हत्या करणाऱ्या गोडसे यांचे समर्थन करणारी भूमिका तुम्ही कशी करू शकता, असा सवाल त्यांना विचारला जाऊ लागला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल कोल्हे यांना पाठिंबा देण्यात आला असून, त्यांनी केलेल्या नथुराम गोडसे भूमिकेला आमचा विरोधा नाही, असे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी याविषयीची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. राष्ट्रवादी हा संविधानाचा सन्मान करणारा पक्ष आहे. या संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येकाला आहेत आणि कर्तव्यही प्रत्येकासाठीच आहेत. त्यानुसार अमोल कोल्हे कलाकार म्हणून नथुराम गोडसेची भूमिका साकारत असतील तर त्याला आमचा विरोध नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. ते टीव्ही९शी बोलत होते.
आमच्या मनात कोणताही संशय नाही
अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारण्याला आमचा विरोध नाही. अमोल कोल्हे यांची कलेशी बांधिलकी आहे. त्यानुसार ते ही भूमिका साकारत आहेत. परंतु त्यांची वैचारिक बांधिलकी ही राष्ट्रवादी पक्षाच्या वैचारिक भूमिकेशीच आहे, याबाबत आमच्या मनात कोणताही संशय नाही. शरद पोंक्षे नथुराम गोडसेची भूमिका त्या विचारांच्या प्रचारासाठी साकारतात तर, अमोल कोल्हे कलाकार म्हणून कलेशी असलेल्या बांधिलकीतून ही भूमिका साकारताहेत, हा त्यातील मुलभूत फरक आहे, असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेंची भूमिका करण्याला राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. अमोल कोल्हे यांनी जरी कलाकार म्हणून ही भूमिका साकारली असली, तरी त्यात गोडसेचे समर्थन आलेच. आणि गोडसेंच्या कृतीचे, गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही. माझा अमोल कोल्हेंच्या गोडसेची भूमिका साकारण्याला विरोध आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.