अजित पवार यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेत काही ज्येष्ठ नेत्यांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतल्याने शरद पवार यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे शरद पवार असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभे राहिले आहेत. तसेच या दोन्ही गटांचं मुंबईत शक्तिप्रदर्शन सुरू आहे. या घडामोडींदरम्यान, पवार कुटुंबातील युवा नेते रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहेत. राज्यात एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपानं आमचं कुटुंब तोडलं, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, लोकसभा किंवा विधानसभेची कुठलीही निवडणूक होण्यापूर्वी पाच-सहा महिने आधी ईव्हीएम मशीनची तपासणी करण्यासाठी केंद्रातून सूचना केल्या जातात. आताही चार दिवसांपूर्वी ईव्हीएम तपासण्यासाठीच्या सूचना आलेल्या आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका ह्या २०२४ मध्ये नाही तर डिसेंबरमध्ये होणार आहेत, असा अंदाज बांधता येतो. त्या निवडणुकांबरोबरच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकही होण्याची शक्यता आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसबाबच जे काही घडलं आहे, ते कुठल्याही मित्रत्वाने झालेलं नाही. तर या निवडणुकीतून राज्यात एकहाती सत्ता मिळवण्यासाठीच भाजपानं आमचं कुटुंब तोडलं आहे, असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, रोहित पवार पुढे म्हणाले की, शरद पवार यांचा राजकीय अनुभव हा ६० वर्षांचा आहे. एवढा मोठा अनुभव असताना साहेबांच्या मनात काय आहे हे लोकांना राजकीय दृष्ट्या कळू शकत नाही. साहेब काहीही करू शकतात, अशी भूमिका सर्वच लोकांची झाली आहे. या भूमिकेच्या आड काही लोक लपतात, असं मला वाटतं. शरद पवार गेल्या काही दिवसांपासून बोलत आहेत. आजही बोलतील. तसेच त्यांनी आधीही याबाबतची भूमिका मांडली आहे. आजही मांडतील, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार हे शरद पवार यांच्यामुळेच निवडून आलेले आहेत, असेही रोहित पवार यांनी सांगितले.