मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं असून बाळासाहेबांनी जे स्वप्न बघितलंय ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू असं म्हटलं आहे. तसेच 'दिवसातून एकदा तरी रोज बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेबांसोबत मी 25 वर्षे कार्यरत होतो' असं म्हणत आठवणींना उजाळा दिला आहे.
छगन भुजबळ यांनी 'दिवसातून एकदा तरी रोज बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेबांसोबत मी 25 वर्षे कार्यरत होतो. शिवसेनेचे चढ-उतार, लढाई होत्या त्यामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी होत होतो. त्या सर्वाचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे, दिवसातून एकदा तरी बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा करुया' असं म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना आमदारांसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेतेही बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बाळासाहेबांचं मोठं योगदान असल्याचं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. 'प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला. समाजकारणाला अग्रक्रम देणारं राजकारण, अमोघ वक्तृत्व, रोखठोक स्वभाव यामुळेच त्यांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन!' असं ट्विट पवार यांनी केलं आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. 'स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला!' असं म्हणत फडणवीस यांनी व्हिडिओ ट्विट करुन आदरांजली वाहिली आहे. स्वाभिमान आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही' असं राऊत यांनी म्हटलं आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवार) सातवा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. 'बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना वचन दिलं आहे. ते पूर्ण होणार आहे. बाळासाहेबांसाठी काहीही करू. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो शिवतीर्थावर येईल' असं राऊत यांनी म्हटलं आहे.