मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे सोमवारी सकाळी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात तीन दिवस उपचार केले जाणार आहेत. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला असून, या काळात त्यांची नियमित तपासणी आणि काही संबंधित चाचण्या केल्या जाणार आहेत.
पवार यांच्यावर उपचार करणारे फिजिशियन डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितले की, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना छातीत थोडासा संसर्गाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन ते तीन दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे.
शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील तीन दिवस उपचारासाठी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यांना २ नोव्हेंबरला डिस्चार्ज मिळेल व ३ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे होणाऱ्या पक्षाच्या शिबिराला ते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, असे म्हटले आहे. पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.