मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा ६२ वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटी घेत आहेत. राजकीय वर्तुळासह समाजातील सर्वच स्तरांतून उद्धव ठाकरे यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र, यातूनही राज्यात मानापमान नाट्य आणि टीका-टिपण्णी होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांना 'हातचे राखून' वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सावरून घेत उद्धव ठाकरेंना शुभकामना दिल्या.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना एकसारखाच मजकूर ट्विट केला. यामध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे, पण त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख ही उपाधीचा उल्लेख दोघांनीही टाळला. यामधून शिंदे आणि फडणवीस यांनी आपले मनसुबे स्पष्ट केल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि संकटमोचक म्हणून ओळख असलेले शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा धावून आले आहेत.
उद्धव ठाकरे यांचा जाणीवपूर्वक 'शिवसेना पक्षप्रमुख' उल्लेख
शरद पवार यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख जाणीवपूर्वक 'शिवसेना पक्षप्रमुख' असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! ठाकरे यांना दीर्घायु चिंतितो व नव्या भावी संकल्पांसाठी शुभकामना, अशा शब्दांत शरद पवार शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो!, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. यावरून आता आगामी काळात शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, यावरुन राजकीय संघर्ष तीव्र होणार असल्याचे सांगितले जात आहे.