तब्बल ४ वेळा बंडखोरीची लागलेली चाहूल; शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनाही दिलेली वॉर्निंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 02:25 PM2022-06-30T14:25:56+5:302022-06-30T14:26:05+5:30
महाविकास आघाडी सरकार पडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली.
मुंबई- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली. राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
महाविकास आघाडी सरकार पडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली. होती. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरींच्या हालचालींबाबत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना तब्बल ४ वेळा क्लपना दिली होती, अशी माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंनी कोणत्याच हालचाली न केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
राज्याच्या गुप्तचर विभागानं एक माहिती उघड केली आहे. या महितीकडे राज्य सरकारनं गांभिर्याने पाहायला हवं होतं, मात्र ते गांभीर्य राज्य सरकारनं वेळीच ओळखलं नाही असा एसआयडीचा हवाल सांगतोय. राज्यातल्या एसआयडीनं म्हणजेच राज्य गुप्तचर विभागानं दोन महिन्यांआधीच राज्य सरकारला एकनाथ शिंदे यांच्या बंडाची जाणीव करुन दिली होती. दोन महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आठ ते दहा आमदार होते असा इशारा एसआयडीनं दिला होता अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, विधानसभेत विश्वासमत सिद्ध करण्याला अवघे काही तास उरले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आघाडी सरकार कोसळले असून देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्यासोबत बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नवे उपमुख्यमंत्री असतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सरकार २५ वर्षे टिकेल- देवेंद्र फडणवीस
काल दिवसभरात घडलेल्या अनेक घडामोडी आणि कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर रात्री सुप्रिम कोर्टाने बहुमत चाचणी नियोजित वेळेनुसार घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यातील जनतेला संबोधित करत उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पराभव झाला म्हणून आपण उन्माद करायचा नाही, असा सल्ला भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले की, अडीच वर्षांनंतर स्थापन होणारं सरकार २५ वर्षे टिकेल. या संपूर्ण लढाईत भाजपाच्या आमदारांची भूमिका महत्त्वाची होती. तसेच या संपूर्ण घटनाक्रमात निर्णायक भूमिका घेणाऱ्या शिंदे गटातील आमदारांचेही मी आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.