मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील १३ आमदार देखील असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलबाहेर आता गुजरात पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरत हा भाजपाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याचदरम्यान, गुजरातमधील भाजपा नेत्यांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी हॉटेलच्या दिशेनं रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत आज दिल्लीसाठी रवाना होणार होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी संजय राऊत दिल्लीला जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र राज्यातील या घडामोडी बघता संजय राऊतांनी दिल्ली दौरा रद्द केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील महाविकास आघाडीतील नेत्यांची तातडीची बैठक बोलावल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत एकनाथ शिंदेंची नाराजी कशी दूर करता येईल, महाविकास आघाडी सरकार कसं वाचवता येईल, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या सर्व आमदारांची देखील आज दूपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक होणार आहे. मात्र एकनाथ शिंदे देखील आज दुपारी १२ वाजता गुजरातमधून पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात ते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती समोर येत आहे.
सरकार म्हणून आता विचार करण्याची गरज-
अडीच वर्ष सत्तेत राहूनही पक्षाची मतं फुटत असतील तर सरकार म्हणून आम्हाला विचार करण्याची गरज आता आहे. आपल्याच पक्षाची मतं जर फुटत असतील तर दुसऱ्यांना दोष देऊन काय उपयोग? इतरांना दोष देण्याचा मुद्दाच नाही. आम्हालाच आता विचार करण्याची गरज आहे. अडीच वर्ष सत्तेत राहूनही जर आमदारांमध्ये नाराजी असेल तर नेमकं कुठं चुकतंय याचा विचार करण्याची गरज आहे. नक्कीच आजच्या निकालाची माहिती पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवली जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी निकालानंतर दिली.