'शिवाजी पार्क म्हणजे, शिवसेना हेच समीकरण'; शरद पवारांचं दसरा मेळाव्यावरुन विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 12:12 PM2022-09-19T12:12:43+5:302022-09-19T12:13:00+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन विधान केलं आहे.
दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ सुरू असताना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण बीकेसीच्या एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्यास शिंदे गटाचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे.
दसरा मेळाव्याकरता बीकेसीतील एक मैदान शिंदे गटानं आरक्षित केलं आहे. मात्र अद्याप ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी कोणतही मैदान मिळालेलं नाही. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दसरा मेळाव्यावरुन सुरु असणाऱ्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी पार्क म्हणजे शिवसेना हेच समीकरण आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे, असं शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांनी सोलापूर दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
एमएमआरडीच्या मुख्य मैदानासाठी शिंदे गटाकून अर्ज दाखल करण्यात आला होता. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या नियमाअंतर्गत एमएमआरडीएकडून शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेनेकडून बीकेसीतील दुसऱ्या मैदानासाठी परवानगी मागण्यात आली होती. पण संबंधित मैदान आधीच एका कंपनीकडून कार्यक्रमासाठी आरक्षित केल्यानं ठाकरे गटाची परवानगी नाकारण्यात आली आहे.
दरम्यान, बीकेसीतील मैदानासाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य हाच निकष जर लावण्यात आला असेल तर शीवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यसाठी आम्हालाच परवानगी मिळायला हवी. कारण शिवसेनेनं पहिला अर्ज दाखल केला आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. आमचा गट वगैरे काही नाही. आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि एमएमआरडीएवर शिंदे गटाला परवानगी देण्यात आल्याचं मला कळालं. प्रथम येणाऱ्या प्राधान्य या निकषाअंतर्गत त्यांना परवानगी देण्यात आली असेल तर शीवतीर्थवर शिवसेनेलाच परवानगी मिळायला हवी. कारण आम्ही आधी अर्ज दाखल केला आहे. दसरा मेळावा ही एक परंपरा आहे. त्यामुळे मोर्चेबांधणीवगैरे करण्याची आम्हाला गरज नाही. परंपरेनुसार शीवतीर्थवरच शिवसेनेचा मेळावा होईल, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.