मुंबई- बारामती लोकसभा मतदार संघात नियोजित भाजप बारामती लोकसभा मतदारसंघ मिशन २०२४ च्या तयारीसाठी गणेशोत्सवातच भाजपने ‘श्रीगणेशा’ केला आहे. येत्या काळात अनेक बडे नेते बारामतीत येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देखील बारामती लोकसभा मतदारसंघात येणार आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या ताब्यात येईल, यासाठी पक्षश्रेष्ठींनी केंद्रीय पातळीवरील बडे नेते बारामतीत येणार असल्याचे नियोजन केले आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीत बारामतीतून भाजपाचाच खासदार निवडून येईल, यासाठी दिल्लीवरून नियोजन सुरु आहे. याबाबत आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काहीही भाष्य केलं नव्हतं. आज शरद पवार यांना बारामती मतदारसंघावर पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर निर्मला सीतारामन यांची भाषा बारामतीकरांना सहज समजेल, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
आगामी बारामती लोकसभा निवडणुक भाजपाचे ‘लक्ष्य’ असल्याचे संकेत जणु यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिले. त्यासाठी भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणी करण्यासह, कार्यकर्त्यांना बळ देणे, बुथ कमिट्यांना स्फूर्ती यावी, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यावर भर देण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभूर्मीवर या मतदारसंघात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
काही बडे नेते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे भाजप बारामतीला खिंडार पाडण्यात कितपत यशस्वी होणार याकडे लक्ष लागले आहे. सीतारामन या पुढील १८ महिन्यात बारामती लोकसभा मतदासंघात पाच ते सहा वेळा येतील. प्रत्येक वेळी मतदारसंघात त्या तीन दिवस मुक्काम करणार आहेत. येथील विकासकामांची या दौऱ्यात माहिती घेण्यात येईल. मतदारसंघासाठी गरज असणाऱ्या कामांचा त्या आढावा घेतील.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित मतदारसंघातील आवश्यक विकासकामे करण्याबाबतचा त्या आढावा घेतील. तसेच केंद्र सरकारच्या सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजनांची गेल्या अडीच वर्षात झालेली अंमलबजावणी, सर्वसामान्यांपर्यत या योजना पोहोचल्या का, याचा देखील आढावा या दौऱ्यात सीतारामन घेणार आहेत. तसेच केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजनांचे गेल्या अडीच वर्षातील ऑडीट होणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.