मुंबई- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. सदर घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.
संविधानाने सर्वांना अधिकार दिलेत आहेत, ज्यानी हे संविधान दिले त्यांच्या महापरिनिर्वाण दिवशी आज काही तोडफोडीची घटना घडली आहे. कर्नाटक सरकारकडून सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत. सातत्यानं वेगवेगळी वक्तव्ये येतं आहेत. हे अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे सीमाप्रश्नी आता भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
'महाराष्ट्रामुळेच हा तणाव निर्माण झाला, आम्ही कायदेशीर लढाई जिंकू'; बोम्मई पुन्हा बरळले!
शरद पवार पुढे म्हणाले की, हे प्रकरण येत्या ४८ तासांत संपलं नाही, तर मला बेळगावात जावं लागेल. तेथिल स्थानिकांना धीर द्यावा लागेल, असंही शरद पवार म्हणाले. वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा देखील शरद पवार यांनी दिला आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तात्काळ या घटनेची दखल घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी करुन आक्रमकपणे भूमिक मांडली. फडणवीसांनी बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. तसेच, महाराष्ट्रातून येणार्या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र- मंत्री उदय सामंत
शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. चिथावणी करणारे कृत्य कुठल्याही राज्याने करू नये, महाराष्ट्रातील जनता ही संयमी आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो, असं उदय सामंत म्हणाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील जनतेचा संयम सुटला नाही पाहजे, याची दक्षता कर्नाटकने घेतली पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राचा अतं पाहू नका, असा इशारा देखील उदय सामंत यांनी दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"