मुंबई: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे लागलेला केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा, राज ठाकरेंनी मशिदींवरील लावून धरलेला मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा, ठाकरे सरकारला दिलेले अल्टिमेटम, महाविकास आघाडीवर भाजपची सातत्याने होत असलेली टीका यांसारखे मुद्दे चांगलेच गाजताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केल्याचे वृत्त आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या दोन्ही शीर्षस्थ नेत्यांनी प्रत्यक्ष बैठक वा भेट घेतल्याचे प्रसंग अगदीच दुरापास्त झालेले असताना अचानक ही भेट घेण्याचे कारण काय? यावरून आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. टीव्ही९ ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
शरद पवार आणि ठाकरे भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरून अनेक तर्क लढवले जात आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण, आरोप-प्रत्यारोप, भाजपची आक्रमक भूमिका, भोंग्यांचे राजकारण, मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुका, राज ठाकरेंच्या सभा, इंधन दरवाढीचा फटका, त्यावरून होणारे राजकारण अशा अनेक मुद्द्यांचा या बैठकीत दोन्ही प्रमुख नेत्यांनी आढावा घेतला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी गोपनीय अहवालांचा उल्लेख करत ३ मे नंतर राज्यात विध्वंसक परिस्थिती निर्माण होण्याची भीती वर्तवली होती. त्यांचा हा इशारा पाहता पवार आणि ठाकरे या दोन बडे नेत्यांमधील बैठक ही महत्त्वाची मानवी जात आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महामंडळाच्या नियुक्त्यांच्या मुद्द्यावरुनही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.