Sharad Pawar And Gautami Patil: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीचा एक कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. शरद पवार यांनी अनेकविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीका केली. मात्र, या कार्यक्रमात बोलताना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावरून भाष्य केले.
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिची राज्यभरात क्रेझ आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांत तुफान राडेही होत असतात. मात्र, निमित्त कोणतेही असो, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना मोठी डिमांड असल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी दत्तक शाळांच्या मुद्द्यावरून टीका करताना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचा उल्लेख केला.
मद्य कंपनीने शाळा दत्तक घेतली आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला
सरकार खासगी कंपन्यांना जिल्हा परिषद शाळा चालवायला देणार आहेत. सीएसआर फंडातून या शाळा चालवण्यास परवानगी देणार आहेत. यातून विकास करावा. ज्या कंपनीने शाळा दत्तक घेतली, त्या शाळेला कोणतेही नाव घेण्याचा नाव देण्याचा अधिकार आहे. शाळेच्या कारभारात दखल देण्याचा, शाळेची संपत्ती खासगी कार्यक्रमासाठी देण्याचा अधिकार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एका मद्य बनवणाऱ्या कंपनीने एक शाळा दत्तक घेतली. तेथे त्यांनी गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम घेतला, असे सांगत शरद पवार यांनी टीकास्त्र सोडले.
दरम्यान, महिला उत्तम संघटनात्मक काम करतात, हे सर्वांनी दाखवून दिले. महिलांना लष्करात काम करायला मिळावे, हा निर्णय संरक्षण मंत्री असताना घेतला. मात्र देशात महिलांची धिंड काढली जात आहे. महिलांवर अन्याय झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला बहिणी यांनी रस्त्यावरच उतरले पाहिजे. नोकऱ्यांची कमतरता आहे, दुसरीकडे रिक्त जागांची संख्या जास्त आहे. कंत्राटी नोकऱ्यांवर भर देण्यात येत आहे, यात आरक्षण कुठेच नाही. कंत्राटी भरतीत कुणालाच नाही, महिलांनाही आरक्षण नसते. म्हणून कंत्राटी भरतीमध्ये महिलांना संधीच मिळणार नाही, असे दिसतेय. राज्यातील १९ हजार महिला बेपत्ता आहेत. व्यक्तिगत हल्ले केले जातात, जिवंत मारले जाते, या शब्दांत शरद पवार यांनी हल्लाबोल केला.