मुंबई - देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने मोठं यश मिळवलं आहे. पाचपैकी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपाला आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
चार राज्यातील जनादेश हा भाजपाच्या बाजूने आला आहे. तर केजरीवालांच्या दिल्लीतील कामगिरीमुळे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल आहे. या जनादेशाचा आदर केला पाहिजे. आता पुढच्या काळात आम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात एक प्रभावी पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केला पाहिजे, असं शरद पवार यांनी सांगितलं.
काँग्रेसची स्थिती पंजबामध्ये चांगली होती. मात्र जे बदल झालं ते जनतेनं नाकारलेत. कॅप्टन अमरेंद्रसिंगसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणं काँग्रेसची चूक झाली. दिल्लीत जे आंदोलन झालं त्यात पंजाबचा फार मोठा भाग सहभागी झाला होता. किसान आंदोलनाचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतोय. म्हणून लोकांनी भाजपा काँग्रेसला नाकारत 'आप'ला सत्ता दिली. पंजाबच्या शेतकऱ्यांत केंद्र सरकारविषयी राग होता. असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.
शरद पवार म्हणाले की, दिल्लीत दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबमध्ये आपला स्वीकारलं. पंजाब वगळता इतर राज्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांना कौल मिळाला आहे. दरम्यान दिल्लीतील माझ्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनीही 'आप'ला मतं दिली होती, असं शरद पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने (AAP) मुसंडी मारली आहे. पंजाबमध्ये एकुण ११७ जागांपैकी आप ९०, काँग्रेस १८, अकाली दल ०६ आणि अन्य १ ठिकाणी आघाडीवर आहे. पंजाबमध्ये आतापर्यंतच्या कलांवरून पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे.
आपच्या कार्यालयांमध्ये जल्लोष-
पंजाबमध्ये सुरूवातीच्या निकालांमध्ये आपनं मोठी मुसंडी मारली आहे. आपच्या कार्यालयांमध्ये सध्या जल्लोष पाहायला मिळत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाब आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंतसिग मान यांचा नवा पोस्टर समोर आला आहे.