मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही माहिती दिली. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. सिल्व्हर ओक निवासस्थानावरील सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानं पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये सुरक्षा रक्षकांसह स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा समावेश आहे. यामुळे शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपेंनी दिली. कोरोनाची लागण झालेल्यांवर उपचार सुरू असून ते राहत असलेल्या परिसरात आलेल्या व्यक्तींच्या कोरोना चाचण्यादेखील करण्यात येणार असल्याचं टोपेंनी सांगितलं.शरद पवार गेल्याच आठवड्यात कराडला गेले होते. या दौऱ्यानंतर मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर शरद पवारांच्या सुरक्षा रक्षकांच्या कोरोना चाचण्यादेखील पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळे शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली आहे. शरद पवारांच्या दोन स्वीय सचिवांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातील एकाचा अहवाल निगेटिव्ह असून दुसऱ्याचा प्रलंबित आहे.कोरोनाची लागण झालेल्या सिल्व्हर ओकवरील कर्मचाऱ्यांना वरळीतील एनएससीआय डोममध्ये उपचारांसाठी ठेवण्यात आलं आहे. याशिवाय महापालिकेनं सिल्व्हर ओक परिसरात फिव्हर कॅम्पदेखील सुरू केला आहे. शरद पवार यांच्या कुटुंबीयांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवारांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. उद्या राष्ट्रवादीची बैठक होणार होती. मात्र शरद पवारांनी ती रद्द केली आहे.
Sharad Pawar Corona Negative :शरद पवारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 10:34 AM