मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांचे वर्चस्व आहे. मात्र या वर्चस्वाला धक्का देताना भारतीय कुस्ती संघटनेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. शरद पवारंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारणसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त झाल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचा कुस्तिगीर संघटनेच्या बरखास्तशी काहीही संबंध नाही. गेल्या काही दिवसांत कुस्तिगीर संघाच्या कामाबद्दल अनक तक्रारी येत होत्या. त्यानंतर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांना मी त्यात सुधारणा करण्यास सांगितले होते, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार यांच्याबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही. पण सचिव बाळासाहेब लांडगे आणि त्यांच्या मुलाकडून भ्रष्टाचार सुरू आहे. याबाबत आम्ही चार दिवस उपोषण केले होते. तरी लांडगे यांनी त्याची दखल घेतली नाही. पवारांनी पुणे संघटनेवर कारवाई करू नका असे सांगितले असताना देखील लांडगे यांनी त्याला न जुमानता संलग्नता रद्द केली, असे तक्रारदार संदीप भोंडवे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात काही नुकत्यात झालेल्या सत्तासंघर्षात महाविकास आघाडीला सत्ता गमवावी लागली. त्यानंतर महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेच्या या कारवाईमुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कारभाराव गेल्या काही वर्षापासून आजी-माजी मल्ल तक्रार करतच होते. त्याच पुणे जिल्हा कुस्ती संघटना आघाडीवर होती. त्यांनी राज्य कुस्ती परिषदेच्या जमा खर्चावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.