Join us

ईशान्य मुंबईसह आणखी एका जागेवर राष्ट्रवादी करणार दावा; बैठकीत प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 2:22 AM

आगामी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईसह आणखी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे. तसा प्रस्तावच रविवारी राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत मान्य करण्यात आला. लवकरच तो काँग्रेसपुढे मांडण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईसह आणखी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे. तसा प्रस्तावच रविवारी राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत मान्य करण्यात आला. लवकरच तो काँग्रेसपुढे मांडण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले.आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाचा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीने दोन दिवसांची बैठक घेतली. रविवारी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील स्थितीचा आढावा घेण्यात आला. या वेळी मुंबईतील कार्यकर्त्यांनी ईशान्य मुंबईसह आणखी एका जागेवरून निवडणूक लढविण्याची मागणी केली. मुंबईत सध्या काँग्रेस लोकसभेच्या पाच जागा आणि राष्ट्रवादी एक जागा लढवते. राष्ट्रवादीकडे लोकसभेचा ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आहे. तेथून संजय दिना पाटील यांनी निवडणूक लढविली होती. आता त्यासह आणखी एक जागा मिळावी, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. उत्तर पश्चिम मुंबई किंवा उत्तर मध्य मुंबई यापैकी एका जागेवर लढण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. २०१४ साली उत्तर पश्चिम मतदारसंघातून गुरुदास कामत, तर उत्तर मध्य मुंबईमधून प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवली होती. या जागांवर दावा सांगताना पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि प्रवक्ते नवाब मलिक यांना उमेदवारी देण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकीत अशाप्रकारची मागणी झाल्याचे मान्य केले. बैठकीतील या आढाव्यानुसार काँग्रेसशी चर्चा केली जाईल. सेना-भाजपाचा पराभव करण्याच्या दृष्टीने या मतदारसंघातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. कोणती जागा द्यायची अथवा सोडायची याबाबत चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसमुंबई